कर्नाटकातील मराठी भाषिकांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ४ जानेवारी – भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर महाराष्ट्रावर अन्याय झाल्याची तीव्र भावना होती. मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राचा इतिहास हा संघर्षाचा आहे. आपल्या काही भाषिक बांधवांचा असा महाराष्ट्रात येण्यासाठीचा संघर्ष अजूनही सुरु आहे. त्यामुळे कर्नाटकातील मराठी भाषिकांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये दिला आहे.
यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर कर्नाटकातील मराठी भाषिकांसाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या त्या केल्या जाणार आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बोलताना सांगितले की, गेल्या कित्येक वर्षापासून सीमावादाचा प्रश्न पडून होता. मात्र शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर सीमावादाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्यांदाच या विषयावर चर्चा केली. त्यामुळे हा वाद लवकरच निकालात निघणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रथमच आमच्या सरकार बरोबर चर्चा करून हा वाद सोडवण्याचा विश्वास दिला आहे. त्यामुळे भविष्यातही कर्नाटकातील मराठी भाषिकांसाठी जे जे करता येईल त्या त्या सर्व गोष्टी कर्नाटकातील मराठी भाषिकांसाठी केल्या जाणार असल्याचा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला.
विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेचा गौरव करत जगभरात तिचा होत असलेला विकास हा अभिमानस्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई ही महाराष्ट्र मिळवताना 106 हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. याची जाणीवही माझ्या मनात सातत्याने असते, त्यामुळे मुंबईत मराठी भाषेची, मराठी भाषिकांची पिछेहाट होणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला आहे.

Leave a Reply