भारतातील स्त्री शिक्षण – किशोर पौनीकर

भारतात १८४८ पुर्वीही स्त्री शिक्षण होतेच!
कदाचित त्या गुरुकुला ऐवजी स्वकुलातच शिकत असाव्यात. घरचेच कोणी शिकवत असावे वा गुरू (शिक्षक) घरी येवून शिकवत असावेत.

वेद काळात अगस्त्य ऋषींची पत्नी लोपामुद्रा, याज्ञवल्क ऋषींची पत्नी मैत्रेयी, ब्रह्मवादिनी गार्गी या स्त्रीया केवळ त्यांच्या विद्वत्तेसाठीच प्रसिद्ध नव्हत्या, तर त्या विद्वत् सभेत विद्वानांसोबत वाक्पटुताही करत.

विजय नगर साम्राज्यात तर सरकारी दप्तरांमध्ये लेखनिक पदांवर कितीतरी स्त्रिया होत्या.

पुढे बाराव्या शतकात मुक्ताबाई, मीराबाई, आदी स्त्री संत स्वतंत्र कवने रचत, त्यांचे कवने लिहायला लेखनिक सोबत असतील काय? त्या लेखन करू शकत असल्यानेच त्यांचे अभंग आज आपण वाचू शकतो.
याउपरही कान्होपात्रा, संत चोखामेळ्याची पत्नी सोयरा व बहिण निर्मळा या प्रचलित भाषेत उपेक्षित समाजातील महिला अभंग रचत. घरी अठरावीसे दारिद्र्य असलेल्या या स्त्रिया लेखनिक ठेवू शकत असतील का? वा काव्य प्रतिभेचा अत्त्युच्च अविष्कार म्हणून त्यांनी येनकेन प्रकारेण अक्षर ओळख करून घेतली असेल?

समर्थ रामदास संप्रदायातील आक्कास्वामी व वेणास्वामी यांचे प्रस्थ रामदासी परंपरेत जबरदस्त होते. वेणास्वामी तर मीरजेच्या मठाच्या मठाधिपती होत्या. अक्षरज्ञानाशिवाय का त्यांना विद्वत्तेची येवढी मोठी झेप घेता आली होती?

शिवरायांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता जीजाऊ मांसाहेब, संभाजी महाराजांनंतर आठ वर्ष औरंगजेबाला नामोहरम करणाऱ्या राजाराम पत्नी ताराबाई राणीसरकार या अक्षरज्ञानाशिवाय केवळ हुजऱ्यांच्या भरवशावर प्रशासनात तरबेज झाल्यात?

पेशवे म्हटले की आज अनेकांना त्यांच्या ऐश्वर्यशाली जेवणावळीच आठवतात. पण हे पेशवे छत्रपतींचे राज्य विस्तार करायला सतत लढायांमध्ये गुंतले असतांना पेशवाईच्या कारभारावर घरच्या स्त्रियांचे पुर्ण लक्ष असे. प्रसंगी राजव्यवहारात मसलती देत. त्या निरक्षरच होत्या, असे म्हणण्याचे धाडस आपण करू शकतो का?

मध्यभारतातील प्रतिष्ठीत होळकर साम्राज्य आदर्श पद्धतीने सांभाळतांनाच देशभरातील मंदिरांचा जिर्णोद्धार व नद्यांना घाट बांधून संस्कृती रक्षणात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या, हातात शिवलिंग घेवून न्यायदान करणाऱ्या अहल्याबाई होळकर या १८४८ पुर्वीच होवून गेलेल्या आहेत. या अहल्याबाई खरंच निरक्षर असू शकतील का?

इसवीसन १८२८ ला जन्मलेल्या साक्षात रणरागिणी असलेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना १८४२ ला लग्न होवून झांशीला जाईपर्यंत अक्षरज्ञान मिळालेच नसावे का?

भारत देशात वा महाराष्ट्रात स्त्रियांची पहिली शाळा १८४८ या वर्षी उघडली गेली हे म्हणून आम्ही काय दर्शवत आहोत? याचा अर्थ १८४८ पुर्वी स्त्रियांना अक्षरज्ञानच नव्हते असे म्हणायचे आहे काय?

बाराव्या शतकातील कान्होपात्रा, सोयरा, निर्मळा यांना अक्षरज्ञान मिळण्याची काही तरी सोय असेलच!

विजयनगरात कार्यालयीन लेखनिक स्त्रीया अक्षरज्ञान कुठून शिकल्यात?

जिजाऊ मांसाहेब, ताराबाई राणीसरकार यांना, अहिल्याबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाईं यांना शिक्षणाची वा अक्षर ओळखीची काहीतर रचना प्रचलित समाजात नक्की असावी.

भारतात व महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची सुरूवात १८४८ साली झाली असे म्हणून आम्ही गार्गी मैत्रेयी पासून अगदी लक्ष्मीबाई पर्यंत साऱ्या कर्तबगार स्त्रियांचा उपमर्दच नव्हे तर अपमान करत आहोत हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

किशोर पौनीकर, नागपूर
विश्व संवाद केंद्र विदर्भ

Leave a Reply