संभाजी राजे स्वराज्य रक्षक की धर्मवीर यावर माझ्यासमवेत वादविवाद करावा – अमोल मिटकरी

बुलढाणा : २ जानेवारी – वादग्रस्त विधाने करणाऱ्या शिंदे गट व भाजपच्या आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खुले आव्हान दिले आहे. संभाजी राजे स्वराज्य रक्षक की धर्मवीर यावर सत्ताधारी आमदारांनी माझ्यासमवेत वादविवाद करावा, यात जो हरला त्याने पदाचा राजीनामा द्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे बुलढाणा तालुका अध्यक्ष दत्तात्रय लहाने यांनी आयोजित केलेल्या महापुरुष सन्मान यात्रेचा समारोप देऊळघाट (ता. बुलढाणा) येथे जाहीर सभेने करण्यात झाला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार मिटकरी हजर होते. यावेळी निवडक प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी बोलताना त्यांनी हे आव्हान करून एका नव्या वादाला तोंड फोडले. छत्रपती संभाजी महाराजांचे धर्मवीर म्हणून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न भाजप आणि तत्सम संघटना करत आहे. जे महापुरुषांचा अपमान करतात त्यांना संभाजी राजेंवर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही. आजकाल राजकीय नेत्यांना धर्मवीर ही पदवी लावण्यात येते. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते असे म्हणून शिंदे गटातील आमदार स्वतःची तुलना त्यांच्यासमवेत करण्याचा कोविलवाणा प्रयत्न करीत आहे. यावर कळस म्हणजे, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे देखील स्वतःला धर्मवीर म्हणवून घेतात.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, विरोधकांना अजित दादांवर टीका करण्याचा अजिबात अधिकार नाही. अजित दादांकडे बोट दाखवणे म्हणजे सूर्यावर थुंकणे होय, असे ते म्हणाले. करणी सेनेचे विजय सेंगर यांच्यावर खरपूस टीका करीत त्याला १८१८ ची लढाई तरी माहीत आहे का, असा सवाल मिटकरींनी केला. सेंगर याने छत्रपती उदयनराजे महाराज यांच्यावर टीका केली, राज्यपालांचे समर्थन केले, नथुराम गोडसेचे उदात्तीकरण केले आहे, असेही मिटकरी म्हणाले.

Leave a Reply