पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष देऊन केली ३८ लाखांची फसवणूक

भंडारा : २ जानेवारी – राज्यात नोकरीचे आमिष देऊन आर्थिक फसवणुकीचेही प्रकार समोर येत आहेत. यातच आता भंडारा जिल्ह्यातही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका नामांकीत कंपनीमध्ये पैसा गुंतवून काहीच काळात दुप्पट पैसे करून देण्याचे आमिष देत तुमसर येथील 6 ते 7 जणांची तब्बल 38 लाख 77 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथे उघडकीस आली.
या प्रकरणी तुमसर पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अनेकांची सदर कंपनीने फसवणूक केल्याची माहिती आहे. कुंजनलाल भोंडेकर (30), मृणाली शहारे (25) व ओमप्रकाश रमेश गायधने (33) तिघेही रा. तुमसर अशी आरोपींची नावे आहेत.
दुर्गेश सुरेश कनोजे (35) रा. रविदास नगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, या आरोपी तिघांनी ट्रेडवीन मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, वर्थ मोटिव्ह ट्रेड इन्फिनिटी मल्टी सर्व्हिसेस या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यावेळी लवकरच दामदुप्पट रक्कम देणार असल्याचे आश्वासन दिले. त्यांच्यावर विश्वास ठेवत दुर्गेश सह त्याच्या नातेवाईकांसह 6 ते 7 जणांनी गुंतवणूक केली.
यात सुमारे 38 लाख 77 हजार 60 रुपये या तिघांना दिले. मात्र, मुदत होऊनही रक्कम परत मिळाले नाही. फसवणूकदारास पैसे मागितले तर ते टाळाटाळ करू लागले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दुर्गेश कनोजे यांनी तुमसर पोलिसात तक्रार नोंदविली आहे. तक्रार आणि चौकशी अहवालावरून अप्पर पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने तुमसर पोलीस ठाण्यात आरोपी तिघांविरुद्ध भादंवि 429, 406, 34 कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Leave a Reply