संस्था स्तरावर प्रवेश घेणाऱ्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार – चंद्रकांतदादा पाटील

नागपूर : ३० डिसेंबर – व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मागासवर्गीय विद्यार्थी प्रवेश घेतात. कॅप राऊंडनंतर संस्था स्तरावर प्रवेश दिले जातात. मात्र संस्था स्तरावर प्रवेश घेणाऱ्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जात नाही. ही फेरी प्रवेश प्रक्रियेचा भाग असतानाही या फेरीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांचा लाभ नाकारला जातो. हा मागास समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे शासनाने ठोस भूमिका घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली. त्याला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कॅप राऊंडनंतर संस्था स्तरावर प्रवेश घेणाऱ्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल, अशी घोषणा केली.

यावेळी सभागृहात तारांकित प्रश्नावर बोलताना आ. दरेकर म्हणाले की, खाजगी विनाअनुदानित व कायम विना अनुदानित शिक्षण संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गातील विद्यार्थ्यांनी संस्था स्तरावरील फेरीत प्रवेश घेतल्यास त्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनांचा लाभ राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनाकडून नाकारला जात आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मागील वर्षी एक परिपत्रक जाहीर करून संस्था स्तरावर होणाऱ्या प्रवेशाचे अर्ज शिष्यवृत्तीसाठी पाठविण्यात येऊ नये असे आदेश निर्गमित केले होते. त्यामुळे शेवटच्या फेरीत रिक्त असणाऱ्या जागांवर प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृतीसाठी पात्र असतानाही शिक्षण विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे पुर्ण शुल्क भरून शिक्षण घ्यावे घ्यावे लागत आहे. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी असणारी शेवटची प्रवेश फेरी अगेन्स द कॅप राऊंड ही असते. ही फेरी प्रवेश प्रक्रियेचा भाग असतानाही या फेरीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांचा लाभ नाकारल्याने मागास समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अखेरच्या फेरीत प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आ. दरेकर यांनी केली.

त्यावर सकारात्मक उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कॅप राऊंडमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणजे तो विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र नाही, असा एक समज होता. मात्र यापुढे असे न करता संस्था स्तरावर प्रवेश घेणाऱ्या मागास विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती दिली जाईल. त्यासाठी कायद्यात आवश्यक तो बदल केला जाईल.

Leave a Reply