इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या पहिल्या सत्रात पंतप्रधानांच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागारांचे व्याख्यान

नागपूर : ३० डिसेंबर – 108 व्या इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या पहिल्या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय कुमार सूद व्याख्यान सादर करणार आहेत. 3 ते 7 जानेवारी दरम्यान इंडियन सायन्स कॉंग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रा. सूद हे ‘तंत्रज्ञान क्रांती’ या विषयावर पहिले व्याख्यान देणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर दुपारी 2.30 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसर, अमरावती रोड येथील फार्मसी हॉलमध्ये हे सत्र होणार आहे.
या सत्रात एसआरएम विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डी. नारायण राव हेही उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे डॉ. रविचंद्रन, सचिव, पृथ्वी विज्ञान मंत्रालय हे देखील ‘ब्लू इकॉनॉमिक पॉलिसी’ या विषयावर आपले विचार मांडतील. यासोबतच भारतातील जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. राजेश गोखले हे देखील ‘बायो मॅन्युफॅक्चरिंग’ या विषयावर भाषण करतील. सीएसआयआरचे महासंचालक डॉ. एन. कलैसेल्वी हे ‘इंडिया अॅट 2030’ या विषयावर समारोप सत्रात मार्गदर्शन करतील. विशेष म्हणजे नोबेल पारितोषिक विजेते अॅडा योनाथ आणि फ्रेझर स्टॉडार्ड यांसारखे शास्त्रज्ञही या परिषदेत सहभागी होत आहेत.
यावर्षी, भारतीय विज्ञान काँग्रेसची थीम ‘महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ होती. त्यामुळे महिलांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर यात चर्चा होणार आहे. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, नीता अंबानी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास संमती दिली आहे. त्याचवेळी त्यांची सुधा मूर्ती यांच्याशी चर्चा सुरु आहे.
नुकतीच विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च शिक्षण विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत सायन्स काँग्रेसच्या संदर्भात बैठक घेतली. त्यात नागपूर विद्यापीठासह राज्य सरकारही या कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचवेळी सायन्स काँग्रेसमध्ये विदर्भाशी संबंधित 25 विविध प्रकारची मॉडेल्स दाखवण्यात येणार आहेत.

Leave a Reply