आईच्या निधनाचे दु:ख बाजूला सारून काही तासांमध्ये पंतप्रधान पुन्हा देशसेवेत रुजू

अहमदाबाद: ३० डिसेंबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या अथक परिश्रम करण्याच्या वृत्तीमुळे सातत्याने चर्चेत असतात. नरेंद्र मोदी हे देशासाठी सर्वस्व झोकून देऊन दिवसरात्र काम करतात, असे त्यांच्या समर्थकांकडून अभिमानाने सांगितले जाते. मोदींच्या याच गुणाचा प्रत्यय शुक्रवारी देशवासियांना आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे शुक्रवारी पहाटे तीन वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. नरेंद्र मोदी यांनी साधारण सहाच्या सुमारास ट्विट करुन आईच्या निधनाबद्दल सर्वांना माहिती दिली. यानंतर नरेंद्र मोदी आपल्या आईचे अंत्यदर्शन घेण्यासाठी अहमदाबाद येथील आपल्या भावाची घरी पोहोचले. येथून सकाळी आठच्या सुमारास हिराबेन मोदी यांची अंत्ययात्रा निघाली. यानंतर तास-दीड तासात पंतप्रधान मोदी यांनी आपल्या आईच्या पार्थिवाला अग्नी दिला. आईच्या निधनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द करतील, असा अनेकांचा अंदाज होता. परंतु, नेमक्या याचवेळी नरेंद्र मोदी यांनी आपण इतरांपेक्षा वेगळे का आहोत, हे दाखवून दिले. पंतप्रधान मोदी हे आईच्या निधनाचे दु:ख बाजूला सारून अवघ्या काही तासांमध्ये पुन्हा देशसेवेसाठी रुजू झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये वंदे भारत एक्स्प्रेससह काही विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार होते. परंतु, आईच्या निधनामुळे मोदी या कार्यक्रमाला जाणार नाहीत, अशी अटकळ बहुतेकांनी बांधली होती. परंतु, आईच्या चितेला अग्नी दिल्यानंतर पंतप्रधान मोदी अवघ्या दीड तासात या कार्यक्रमासाठी सज्ज झाले. त्यांना पश्चिम बंगालला प्रत्यक्षात जाता आले नाही, पण मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. संपूर्ण वेळ मोदी या कार्यक्रमात हजर होते. यानंतर मोदींनी हिरवा झेंडा दाखवून पश्चिम बंगालमधील वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण केले. यानंतर पंतप्रधान मोदी नियोजित वेळापत्रकानुसार पुढच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावतील. आईच्या निधनाला काही तास उलटत नाही तोच पंतप्रधान मोदी पुन्हा कामाला लागल्याचे पाहून अनेकजण स्तिमीत झाले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सांत्वन केले. आदरणीय पंतप्रधान, आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत दु:खाचा आणि अपरिमीत हानीचा आहे. आज तुम्ही विकासकामांच्या उद्घाटनासाठी पश्चिम बंगालमध्ये येणार होतात. पण आईच्या निधनामुळे तुम्हाला या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावावी लागत आहे. मी ईश्वराकडे प्रार्थना करते की, तुम्हाला या दु:खातून सावरण्यासाठी बळ मिळो, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.

Leave a Reply