दीक्षाभूमी पवित्र भूमी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर : २९ डिसेंबर – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (२९ डिसेंबर) नागपूरमधील दीक्षाभूमी येथे भेट दिली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलशाला अभिवादन केलं आणि गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाले. यावेळी शिंदे-फडणवीसांनी दीक्षाभूमी पवित्र भूमी असल्याचं सांगत यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असं आश्वासन दिलं.
दीक्षाभूमीला ४० कोटी रुपये देण्यात आले. मात्र, शासकीय मान्यता अद्यापही पूर्ण झालेली नाही. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारण्यात आलं. ते म्हणाले, “दीक्षाभूमीसाठी जे हवं ते दिलं जाईल, कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही. शेवटी ही पवित्र भूमी आहे. त्यामुळे येथे सरकार कुठेही कमी पडणार नाही. आम्ही दोघे येथे आहोत.”
दीक्षाभूमीला देण्यात येणाऱ्या अ दर्जावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सुरुवातीला दीक्षाभूमीला पर्यटनाचा अ दर्जा दिला होता. आता तीर्थक्षेत्राचाही अ दर्जा दिला आहे. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.”
पहिल्यांदा आम्ही समितीशी चर्चा केली त्यावेळी समितीने पर्यटनाचा अ दर्जा देण्याची मागणी केली होती. त्यामुळे तेव्हा पर्यटनाचा अ दर्जा दिला. त्यानंतर सर्वांना असं वाटलं की तीर्थक्षेत्राचाही अ दर्जा दिला पाहिजे. त्यामुळे आता तीर्थक्षेत्राचाही अ दर्जा देण्यात आला,” अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.

Leave a Reply