आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्वच गोष्टींवर अधिकार सांगणार – संजय गायकवाड

नागपूर : २९ डिसेंबर – शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात वेगवेगळ्या कारणांवरून संघर्ष होत आहे. आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा दोन्ही पक्ष करत आहेत. असे असतानाच बुधवारी (२८ डिसेंबर) मुंबई पालिका कार्यालयात या दोन्ही गटात संघर्ष झाला. उद्धव ठाकरे गटाचे लोकप्रतिनिधी गाफील असताना अचानक शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालयावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. यामुळे पालिका मुख्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान याच घटनेचा संदर्भ देत शिंदे गटातील नेते तथा आमदार संजय गायकवाड यांनी मोठे विधान केले आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्वच गोष्टींवर अधिकार सांगणार आहोत, असे संजय गायकवाड म्हणाले आहेत.
“बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला कडवट हिंदुत्वाचा विचार दिला. त्यांनी आम्हाला लढणं शिकवलं. शेताबांधावरचा कार्यकर्ता आज आमदार झालेला आहे. अनेकजण मोठे झाले. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला आज तिलांजली दिली गेली. ज्या दिवशी मी काँग्रेससोबत जाण्याचा विचार करेन, तेव्हा मी माझा पक्ष बंद करेन असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. आज उद्धव ठाकरे यांची सेना त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बसते. सध्या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची पायमल्ली होत आहे,” असा दावा संजय गायकवाड यांनी केला.
“मुंबईला पक्ष कार्यालयावरून राडा झाला. आमच्याकडे सध्या ४० आमदार आहेत. १३ खासदार आहेत. आमचा पक्ष सर्वात मोठा आहे. याच कारणामुळे आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव मिळालेले आहे. बाळासाहेबांच्या ज्या-ज्या गोष्टी असतील त्यावर आम्ही अधिकार सांगणार आहोत,” असे संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply