30 डिसेंबरलाच वाजणार हिवाळी अधिवेशनाचं सूप

नागपूर : २८ डिसेंबर – विरोधकांकडून हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढला तर महत्त्वाचे प्रश्न सभागृहात उपस्थित करता येतील असं म्हटलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात यावा का? यासाठी आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. मात्र या समितीतील सर्वपक्षीय सदस्यांकडून अधिवेशनाचा कालावधी न वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता 30 डिसेंबरलाच हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली होती. या बैठतीमध्ये अधिवेशनाचा कालावधी 19 डिसेंबर ते 29 डिसेंबर असा दोन आठवडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावरून विरोधकांनी नाराजी व्यक्त केली होती. अधिवेशनाचा कालावधी कमीत कमी तीन आठवड्यांचा असावा अशी मागणी मविआच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. आज अधिवेशनाचा आठवा दिवस आहे. अधिवेशनाचा कालावधी वाढवायचा की नाही याबाबत आज पुन्हा एकदा विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अधिवेशनाचा कालावधी न वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आतापर्यंत हिवाळी अधिवेशन वादळी ठरलं आहे. महाराष्ट्र, कर्नाटक सीमावाद, भूखंड वाटपात भ्रष्टाचार असे विविध मुद्दे उपस्थित करून विरोधकांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना धारेवर धरलं. आज पुन्हा एकदा हेच मुद्दे उपस्थित करून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे.

Leave a Reply