आता हे अधिवेशन गुंडाळावे आणि पाहुण्यांनी परत जावे – गिरीश गांधी

नागपूर : २८ डिसेंबर – उपराजधानी नागपूर येथे विधिमंडळाच्या अधिवेशनकाळात लोकप्रतिनिधींचे वागणे पाहून मी अतिशय व्यथित झालो आहे. राज्य आणि विदर्भातील महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन जे काही सुरु आहे ते पाहा, आता हे अधिवेशन गुंडाळावे आणि पाहुण्यांनी परत जावे, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार डॉ. गिरीश गांधी यांनी केले.
महाराष्ट्रातील अनेक नेते मंडळी अधिवेशनाच्या निमित्ताने विदर्भात आल्यानंतर विदर्भातील सामाजिक, सांस्कृतिक, कलेच्या व राजकीय क्षेत्रातील लोकांशी भेटत प्रश्न समजून घेत होते. आता ही परिस्थिती बदलली आहे. नागपुरातील हे अधिवेशन, त्यातील लोकप्रतिनिधींचे वागणे पाहून मन विषण्ण होते. त्यामुळे, हे अधिवेशन गुंडाळावे अन् विदर्भात आलेल्या पाहुण्यांनी परत जावे अशी सर्वसामान्यांची भावना असल्याचे मत डॉ. गिरीश गांधी यांनी व्यक्त केले.
हिवाळी अधिवेशनातील गदारोळावर एक पत्रक प्रसिद्ध करत त्यांनी आजचे राजकारण आणि नेत्यांवर टीका केली. ते म्हणाले की, “मागच्या आठवड्यात, काल आणि आज गदारोळ पाहायला मिळाल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. देशातील कोरोनाच्या संदर्भात उद्भवणारे प्रश्न, विधिमंडळात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पानंतर करण्यात आलेली आर्थिक तरतूद, राज्याच्या विकासाचा आराखडा किंवा विदर्भातील अनेक प्रश्नांचा उहापोह या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन अधिवेशनाच्या निमित्ताने धिंगाणा सुरु असल्याची टीका त्यांनी केली. त्यामुळे, हे अधिवेशन गुंडाळावे आणि विदर्भात येणाऱ्या पाहुण्यांनी आता परत जावे. पुढच्या वर्षी देखील आम्ही तुमची वाट पाहू. परंतु, महाराष्ट्रातील संस्कृतीचा आदर्श देशात निर्माण होईल असा निर्धार करुन या. आम्ही आमच्या पद्धतीने निश्चित स्वागत करु, असंही त्यांनी या पत्रकात नमूद केले.
नागपुरात हिवाळी अधिवेशनात दररोज विरोधी पक्षाकडून विविध मुद्द्यांवर राज्य सरकारला घेरण्यासाठी घोषणा देण्यात येत आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी आमदारांकडूनही विरोधकांवर विविध आरोप करुन घोषणा देण्यात येत आहे. याशिवाय दोन्ही सभागृहातही विविध मुद्द्यांवर वाद होऊ आतापर्यंत दररोज अनेकवेळा सभागृह दहा मिनिटे ते अर्धा तास तसेच गोंधळ वाढल्यावर चक्क दिवसभरासाठी सभागृह तहकूब करण्यात आले आहे. त्यामुळे विधिमंडळात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पानंतर करण्यात आलेली आर्थिक तरतूद, राज्याच्या विकासाचा आराखडा किंवा विदर्भातील अनेक प्रश्नांचा उहापोह या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन अधिवेशनाच्या निमित्ताने धिंगाणा सुरु असल्याची टीकाही गांधी यांनी केली.

Leave a Reply