अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर लवकरच

नागपूर : २८ डिसेंबर – अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्याबाबत लवकरच सर्वसंबंधीत अधिकाऱ्यांची बैठक बोलावून पुढली पाऊले उचलली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रभारी मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत प्रशनोत्तरांच्या तासात दिले.
विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर, रमेश कराड, रामराव पाटील प्रभृती सदस्यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नांच्या उत्तरात केसरकर म्हणाले की या संदर्भात सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रस्ताव मागवला जातो, तसा प्रस्ताव शासनाने मागविला आहे, हा प्रस्ताव आल्यावर मंत्रिमंडळात ठराव होईल आणि त्यानंतर केंद्र सरकारला कालवून जिल्ह्याचे नाव बदलण्याची विनंती करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
अकोला शहरातील पाणीपुरवठा प्रकल्पाअंतर्गत प्रस्तावित कामातील फक्त एका जलकुंभाचे काम अपूर्ण असून ते लवकरच पूर्ण केले जाईल अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.
विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे विक्रम काळे सतीश चव्हाण प्रभृती सदस्यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या उतारावरील चर्चेत सामंत म्हणाले की हे काम स्थानिक वादामुळे प्रलंबित राहिले असून वाद संपवून मार्ग काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, यात कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यपरिवहन मंडळात दरवर्षी नवी वाहने घेतली जात असून राज्यपरिवहन सेवा कोरोना काळानंतर आता पूर्वपदावर येत असल्याचा दावा प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात केला.
विधानपरिषद सदस्य भाई जगताप, सुधीर तांबे प्रभृती ६ सदस्यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात येत्या वर्षात एसटी मध्ये ४०० डिझेल, ५० सीएनजी आणि २५० निमआराम गाड्या नव्याने येणार असून या शिवाय १५० इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या बसेसही भाडेतत्वावर घेतल्या जातील असे देसाई यांनी सांगितले. जिथे प्रवासी जास्त तिथे वाहने जास्त दिले जातात, असे असले तरी ग्रामीण भागात नवी वाहने देण्याचा प्रयत्न करण्याची अनिकेत तटकरे यांची सूचना त्यांनी मान्य केली.
मुंबईतील भगवती रुग्णालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात अद्ययावत सोयीसवलती पुरवण्याबाबतची प्रलंबित कामे पुढील २ महिन्यात पूर्ण करून रुग्णालये सुस्थितीत चालवण्याबाबत स्पष्ट निर्देश मुंबई महापालिका आयुक्त डॉ. चाहूल यांना आजच दिले जातील आणि त्यासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात केली.
विधानपरिषद सदस्य भाई गिरकर , प्रवीण दरेकर प्रभृतींसह ९ सदस्यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी या सुधांनांसंबंधातील सविस्तर माहिती सभागृहाला दिली. यावेळी वरळीतील रुग्णालयाच्या प्रलंबित कामासाठीही तत्काळ निर्देश देण्याचे त्यांनी मान्य केले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील बायोमायनिंगच्या कामात झालेल्या कथित गैरप्रकाराची चौकशी सुरु असून चौकशीत दोषी आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिली.
विधानपरिषद सदस्य सुरेश धस यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सामंत म्हणाले की सदर प्रकरणात घनमीटर कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीला अग्रीम रकम अदा करण्यात आली आहे, या प्रकरणात मुख्याधिकाऱ्यांनी गैरप्रकार केला असल्याची शक्यता असल्याची माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply