अवघ्या १२ वर्षाच्या मुलीचे केले लग्न, गर्भवती होताच पती नॉट रिचेबल

यवतमाळ : २८ डिसेंबर – घरात अठराविश्व दारिद्र्य अन् वयात येत असलेली मुलगी… त्यामुळे अवघ्या १२ वर्षाच्या मुलीचे हात पिवळे करून द्यायची इच्छा आईच्या मनात येते… इच्छेचे कृतीत रूपांतर होते आणि खेळण्या-बागडण्याच्या वयात ती लग्न बंधनात अडकते. ‘तो’ तिचे बालपण कुस्करून टाकतो आणि ती तिच्याच नकळत गर्भात दुसरा जीव वाढवत असते. न कळत्या वयात लादलेल्या मातृत्वाची चाहूल शरीरावर दिसू लागते, शारीरिक दुखणे वाढते… आणि ज्याच्यामुळे ही परिस्थिती ओढवली तो पती मात्र ती गर्भवती असल्याचे लक्षात येताच काम शोधण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडतो आणि ‘नॉट रिचेबल’ होतो!
मारेगाव तालुक्यातील करणवाडी गावातील भटकंती करणाऱ्या एका कुटुंबात झालेल्या बालविवाहाचा प्रकार नुकताच उघडकीस आला. गावात काही कुटुंब झोपडीवजा पालावर वास्तव्यास आहे. मिळेल ते काम करायचे आणि कुटुंबाचा गाडा हाकायचा, असा त्यांचा दिनक्रम. त्यांची अल्पवयीन मुले शिक्षण सोडून भीक मागत कुटुंबाला आधार देण्याचे काम करतात. अशाच एका कुटुंबातील १२ वर्षीय बालिकेचा नागपूर जिल्ह्यातील सालेभट्टी येथील अंकुश राऊत (२४) या तरुणाशी पाच महिन्यांपूर्वी बालविवाह लावून देण्यात आला. या विवाहास कुटुंबातील काही निवडक मंडळी उपस्थित होती, मात्र कोणीही या बालविवाहाची वाच्यता बाहेर केली नाही. बालिकावधू काही दिवसातच गर्भवती राहिली.
तिच्या गर्भात अंकुर वाढत असताना अंकुश कामानिमित्त बाहेर गेला व ‘नॉट रिचेबल’ झाला. तिच्या पोटात गर्भाची वाढ अन् प्रकृती बिघाडामुळे तिच्या आईने तिला दवाखान्यात नेले. तिथे तपासणीनंतर ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे आढळले. डॉक्टरांकडे वयाची नोंद केल्याने या बालिकेचा बालविवाह झाल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यांनी या प्रकरणी मारेगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी प्राथमिक तपास करून बालिकेची आई आणि तिचा तथाकथित पती अंकुश यांच्याविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आईस ताब्यात घेतले. बोनाफाईड प्रमाणपत्रानुसार ही बालिका १२ वर्षांची तर आधार कार्डनुसार तिचे वय १४ वर्षे आढळले. सध्या तिला तिच्या एका नातेवाईकाकडे ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मारेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश पुरी यांनी दिली.
बालविवाह प्रकरणात गुन्ह्यात अडकलेल्या व आपली जबाबदारी विसरून पोबारा केलेल्या संशायित पतीचा मारेगाव पोलीस शोध घेत आहे. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत यांच्या नेतृत्वात चार पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक अंकुशच्या शोधात रवाना झाले आहे.

Leave a Reply