विधान परिषदेतील आयुधे यात औचित्याच्या मुद्द्यावर समन्वयक म्हणून कक्ष अधिकारी नेमण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

नागपूर : २७ डिसेंबर – सभागृहात मांडले जाणारे औचित्याचे मुद्दे, विशेष उल्लेख, तातडीचे मुद्दे यावर वारंवार सूचना देऊनही त्याचे पालन होत नाही. बरेचदा संबंधित प्रस्ताव मांडणारे सदस्य दिवंगत होऊन जातात. त्यानंतर त्यांनी मांडलेल्या प्रस्ताव,सूचना औचित्य याची उत्तरे येत असतात. मात्र ते वेळेवर येत नाहीत. हा विषय अतिशय चिंताजनक असून असे विषय हाताळण्यासाठी व मार्गी लावण्यासाठी समन्वयक म्हणून एक कक्ष अधिकारी नेमण्यात यावा असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मंगळवारी सभागृहात दिले.

सभागृहामध्ये सभापती, उपसभापती यांनी दिलेले निर्देश, सूचना यावर वेळोवेळी अंमलबजावणी करणे ही शासकीय यंत्रणेची जबाबदारी आहे असे विरोधी पक्षातील एकनाथ खडसे यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले. तसेच सभापती, उपसभापतींच्या निर्देशाचे अनेक वेळा पालन होत नाही याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले.
त्यावर सदर विषय अतिशय गंभीर असून अनेकदा आपल्याही लक्षात अशा प्रकारचे विषय आल्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. बरेचसे सदस्य दिवंगत होऊन जातात पण त्यांनी तातडीने मांडलेले मुद्दे किंवा औचित्य जर लेखी स्वरूपात नसतील तर त्याची दखल फार उशिरा घेतली जाते. त्याची उत्तरे निर्धारित कालावधीमध्ये सादर केली जात नाहीत. त्यामुळे त्या सदस्यांनी पोटतिडकीने मांडलेले व पुढे आणलेले मुद्दे,औचित्याला न्याय मिळत नाही. त्यामुळे या संदर्भात समन्वयक म्हणून एक कक्ष अधिकारी नेमला जावा असे सांगत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

दरम्यान उपसभापतींच्या नाराजी नंतर त्यावेळी सभागृहात उपस्थित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, यासंदर्भात तत्काळ प्रभावाने मुख्य सचिवांना सूचना देऊन या संदर्भात बैठकीचे आयोजन करून सभागृहात दिले जाणारे निर्देश आणि सूचना याचे पालन व्यवस्थित होईल याकडे लक्ष देणे दिले जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

Leave a Reply