लोणार सरोवरातील पाण्याच्या पातळीने गाठला २० वर्षातील उच्चांक

बुलढाणा : २७ डिसेंबर – अशनीच्या आघातामुळे तयार झालेल्या लोणार विवरातील सरोवराच्या पाण्याच्या पातळीने वीस वर्षांतील उच्चांक गाठला आहे. पाणी वाढल्यामुळे विवरातील काही मंदिरे पाण्याखाली गेली असून, सरोवराच्या परिक्रमेचा मार्गही बंद झाला आहे.
पुण्यातील ‘सेंटर फॉर सिटीझन सायन्स’तर्फे (सीसीएस) लोणार विवर आणि सरोवराचा अभ्यास दौरा नुकताच पार पडला. या सर्वेक्षणादरम्यान वाढलेल्या पाणी पातळीमुळे लोणार सरोवराच्या पाण्याची क्षारताही काही प्रमाणात कमी झाल्याचे समोर आले. ‘सीसीएस’ने २०१७मध्ये केलेल्या सर्वेक्षणात लोणार सरोवराची पाण्याच्या पातळी कमी होत असल्याचे दिसून आले होते. उपग्रहीय चित्रांनुसार २०१४ ते २०२० या कालावधीत सरोवराच्या पाण्याची पातळी कमी होत राहिली. त्याचाच परिणाम म्हणून जून २०२० मध्ये ‘हॅलो आर्कीया’मुळे सरोवराच्या पाण्याचा रंग गुलाबी झाल्याचे आढळून आले होते. मात्र, दोन वर्षांत झालेल्या सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे सरोवराच्या पाण्याच्या पातळीत कमी कालावधीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या आधी लोणारच्या पाण्याची पातळी २००३- २००४ या वर्षांमध्ये वाढलेली दिसून आली होती. २०१७ मध्ये सरोवराच्या पाण्याचा पोटेन्शिअल हायड्रोजन (पीएच) ९.५ नोंदला गेला होता. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात हा पीएच ८.५ ते ९ च्या दरम्यान असल्याचे आढळून आले.
या स्थितीबाबत लोणार अभयारण्याचे वन्य परिक्षेत्र अधिकारी चेतन राठोड म्हणाले, ‘पावसाळ्यात जमिनीवरून आणि झऱ्यांवाटे लोणार सरोवराला पाण्याचा पुरवठा होत असतो. त्यानंतर फक्त झऱ्यांचे पाणी सरोवरात मिसळत राहते. यंदा पावसाळ्याच्या काळात सरोवरात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्याची नोंद आम्ही घेतली. सध्या डिसेंबरमध्येही सरोवराच्या पाण्याचा मुख्य स्रोत असणारे धार आणि रामगया हे दोन्ही झरे सक्रिय असून, रोज हजारो लिटर पाणी सरोवरात जमा होत आहे.’
पाणीपातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे सांगत लोणार अभयारण्याचे वन्य परिक्षेत्र अधिकारी चेतन राठोड म्हणाले, ‘रोज हजारो लिटर पाणी जमा होत असल्यामुळे पाणी विवराच्या पायथ्यापासून काही मीटर अंतरावर पोचले असून, काही मंदिरे पाण्याखाली गेली आहेत; तर काही मंदिरांच्या पायऱ्यांपर्यंत सरोवराचे पाणी पोचले आहे. सरोवराभोवती परिक्रमेचे मार्गही बंद झाले असून, निसर्गप्रेमी आणि भाविकांना फक्त कमळजा देवीच्या मंदिरापर्यंतच जाता येत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची पातळी काहीशी कमी होत असते. आगामी उन्हाळ्यात मात्र, पाण्याची पातळी नेहमीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.’
उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर लोणार संवर्धनासाठी राज्य आणि केंद्र सरकराने उचललेल्या पावलांचे काही सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. ‘विवरात उतरण्यासाठी आता एकच प्रवेशमार्ग सुरू असून, त्यावरही वन विभागाची देखरेख असते. विवराकाठची शेती बंद झाली. बेसुमार वाढलेली बाभळीची झाडेही काढण्यात आली. मानवी वावर मर्यादित झाल्यामुळे लोणार अभयारण्यात सध्या सात बिबटे वास्तव्याला आहेत. २०१९मध्ये बिबट्यांची संख्या चार होती. आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या (एएसआय) रिस्टोरेशनमुळे मंदिरे स्वच्छ झाली असून, मंदिरांच्या आसपासची जमिनीत गाडली गेलेली अनेक प्राचीन बांधकामे नव्याने समोर येऊ लागली आहेत,’ अशी माहिती चेतन राठोड यांनी दिली.

Leave a Reply