लम्पी आजाराने सर्वाधिक जनावरांचा मृत्यू कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघात

औरंगाबाद : २७ डिसेंबर – लम्पीचा प्रादुर्भाव अजूनही काही थांबताना दिसत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जिल्ह्यात लम्पीने अक्षरशः थैमान घातला असल्याचं आकडेवारीतून समोर आले आहे. कारण लम्पी आजाराने अवघ्या साडेतीन महिन्यांत औरंगाबाद जिल्ह्यातील1 हजार 11 जनावरांचा बळी घेतला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वाधिक 241 जनावरांचा मृत्यूचा आकडा अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांत जनावरांमध्ये लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यांतही लम्पीचा आजार वाढत आहे. वाढता प्रादुर्भाव पाहता पशुसंवर्धन विभागाने लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबविली होती. ज्यात जिल्ह्यातील 5 लाख 38 हजार 572 जनावरांचे लसीकरण करण्यात आले. मात्र असे असतानाच लम्पीमुळे मरण पावलेल्या जनावरांची संख्या हजारांपार गेल्याने, लम्पीचा आजार पुन्हा फोफावण्याची भीती पशुपालकांकडून व्यक्त होत आहे. जिल्ह्यात लम्पीने आत्तापर्यंत 1 हजार 11 जनावरांचा बळी घेतला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील आकडेवारी पाहिली असता कृषिमंत्र्यांच्याच तालुक्यात लम्पीचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे. जिल्ह्यातील गंगापूर, खुलताबाद आणि वैजापूर या तालुक्यांत बाधित जनावरांचे आणि मृत्यूचे प्रमाण सर्वांत कमी आहे. पैठण तालुक्यात बाधित जनावरांची संख्या वाढलेली असली, तरी या आजारामुळे होणारे मृत्यू रोखण्यात यश आलेले आहे.

Leave a Reply