उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जानेवारीत बोलावली हाफकीन संदर्भात बैठक

नागपूर : २७ डिसेंबर – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील हाफकीन महामंडळाच्या बळकटीकरणासाठी जानेवारी महिन्यात बैठक बोलावली आहे. हाफकिन महामंडळाशी संबंधित प्रवीण दटके यांनी दिलेल्या लक्षवेधी सूचनेवरील सभागृहात झालेल्या चर्चेनंतर उपसभापतींनी हा निर्णय घेतला.

हाफकीनच्या कार्यप्रणालीमुळे रुग्णालयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्जिकल साहित्याच्या तुटवड्यामुळे रुग्णसेवेत अडचणी येत आहेत. यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याबाबत प्रवीण दटके यांनी त्यांच्या लक्षवेधी सूचनेत मुद्दा उपस्थित केला. त्यावर सचिन अहिर आणि सतीश चव्हाण यांनी देखील महत्त्वाचे मुद्दे उपस्थीत केले. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित प्रश्नांच्या अनुषंगाने सभागृहात माहिती दिली. एकंदर परिस्थिती, प्रश्नाची व्यप्ती आणि हाफकिनची परिस्थिती पाहता उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यासंदर्भात आगामी जानेवारी 2023 मध्ये बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला.

यासंदर्भात डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, हाफकीन अतिशय सुंदर काम करते. परंतु, येथील संशोधकांना त्यांची कामे करता येत नाही. त्यामुळे अनेकांनी निराश होऊन हाफकिन सोडले. संशोधकांना त्यांचे मुळ काम सोडून इतर प्रशासकीय कामे करवून घेतली जातात. अगदी क्वॉर्टर बांधण्यासारखी कामे त्यांना करावी लागत असल्याचे उपसभापतींनी सांगितले. तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी याविषयात लक्ष घालावे आणि जानेवारीत याबाबत बैठक घ्यावी असे उपसभापतींनी सांगितले. तसेच यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना व सल्ला देणारे आ. सतीश चव्हाण यांना देखील या बैठकीत उपस्थित राहण्याची सूचना नीलम गोऱ्हे यांनी केली.

Leave a Reply