सोलापूरच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे विधानपरिषदेत निलंबन

नागपूर : २६ डिसेंबर – एका तारांकित प्रश्नात गैरप्रकार करणाऱ्या अधिकाऱ्याला दुसऱ्या तारांकित प्रश्नावरील चर्चेत निलंबित करण्याचा प्रकार आज विधानपरिषदेत घडला. सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे स्थापन करण्याबाबत विधानपरिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता, याच्या उत्तरात २०१९ सालीच नवी उपकेंद्रे स्थापन करण्याबाबत प्रस्ताव तयार झाला होता असे उत्तर सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिले होते.
या मुद्द्यावर बरीच चर्चा झाल्यानंतर पुन्हा एकदा समिती गठीत करून आढावा घेऊ आणि नवी प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारणे आणि त्यातील सुधारणा याबाबत निर्णय घेऊ असे उत्तर तानाजी सावंत यांनी दिले. सर्व रुग्णालयांचा आढावा येत्या १० दिवसात घेतला जाईल असेही त्यांनी मान्य केले.
नंतर औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथे ट्रामा केयर सेंटर उभारण्याचा प्रस्तावावरील विधानपरिषद सदस्य सतीश चव्हाण आणि विक्रम काळे यांच्या प्रश्नावरही चर्चा झाली. यातही संबंधित अधिकाऱ्यांनी पाऊले उचलली नाहीत असा विरोधकांचा दावा होता. यावेळी सोलापूरचा मुद्दा उपस्थित करत तानाजी सावंत यांनी सोलापूरमध्ये झालेल्या उशिरासाठी जबाबदार असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल जाधव यांना तत्काळ निलंबित करण्याचीच घोषणा करून टाकली.
खुलताबाद येथे विद्यमान निकषांनुसार ट्रामा केयर सेंटर उभारता येत नाही तरीही खास बाब म्हणून तिथे ट्रामा केयर सेंटर उभारण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे तानाजी सावंत यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply