सीमावाद महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय, मात्र विरोधकांत श्रेयवादाची लढाई सुरु – प्रविण दरेकर

नागपूर : २६ डिसेंबर – कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र प्रदेश केंद्रशासीत करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषदेत केली. तसेच आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सत्ताधाऱ्यांवरही टीका केली. त्यांच्या या टीकेला विधानपरिषदेचे गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनीही चोख प्रत्युत्तर दिले. सीमावाद हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. मात्र कर्नाटक सीमावादावरून विरोधकांत श्रेयवादाची लढाई सुरु आहे, अशी घणाघाती टीकाही दरेकर यांनी केली.
यावेळी सभागृहात बोलताना आ. दरेकर म्हणाले की, सीमा भाषिकांच्या, मराठी माणसांच्या पाठीशी राहण्यासंदर्भात हे सभागृह सातत्याने एकमताने राहिलेले आहे. जेव्हा जेव्हा या सभागृहात चर्चा झाली तेव्हा राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवून सार्वभौम सभागृह सीमावासियांच्या बाजूने उभे राहिल्याची अनेक उदाहरणं आहेत. राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवून संपूर्ण महाराष्ट्र सीमावासियांच्या बाजूने आहे अशा प्रकारचे चांगले वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, अशी विनंतीही दरेकर यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, एकनाथ खडसे यांनी सांगितले मुख्यमंत्र्यांनी ठराव आणायला हवा होता. हे सरकार ठराव आणण्याच्या तयारीत आहे. परंतु इथे श्रेयवाद घेण्याची घाई झाली आहे. भाजपा असेल, मुख्यमंत्री शिंदे असतील आम्ही सर्व सीमावासियांच्या मागे ठामपणे उभे आहोत. यावेळी दरेकर यांनी सीमाप्रशनी गेल्या दोन-अडीच वर्षाच्या कालावधीत राज्य सरकारने मनात आणले असते तर काही करता आले असते हे दिवाकर रावते यांचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाचे वक्तव्य सभागृहात वाचून दाखवले. सीमा भागातील लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरु आहे. तो सुरु असताना केवळ सत्ताधारी पक्षच विरोधात आहे, अशा प्रकारचे खोटे चित्र रंगविण्याचे काम काही लोकं राजकीय उद्देशाने करताना दिसत आहेत. ज्यावेळेला हा अन्याय अत्याचार झाला त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, शंभूराजे देसाई यांनी सीमाभागातील मराठी माणसांच्या मागे उभे राहू अशी भूमिका घेतली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची मग्रुरीची वक्तव्ये समोर आली. त्यावेळी फडणवीसांनी सांगितले की, बोम्मई किंवा तेथील मुख्यमंत्री सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे नाहीत. आमच्या नसानसांत सीमावासियांच्या बाबतीत प्रेम भरलेले आहे. सीमावाद कुणाची मक्तेदारी नाही. हा कुणा पक्षाचा विषय नाही. हा महाराष्ट्राचा, महाराष्ट्राच्या अस्मितेचा, मराठी माणसाचा विषय आहे, असेही दरेकर म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देताना दरेकर म्हणाले की, आज सांगताहेत केंद्रात भाजपाचे, राज्यात शिंदे-फडणवीस यांचे आणि कर्नाटकात भाजपाचे सरकार आहे. १९६० पासून केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. राज्यात काँग्रेसचे सरकार होते. कर्नाटकातही काँग्रेसचे सरकारचे होते. त्यावेळी तिन्ही ठिकाणी काँग्रेसची सरकारे होती. त्यावर का भाष्य करत नाहीत. म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे, असा टोलाही दरेकर यांनी लगावला.

दरेकर पुढे म्हणाले की, छगन भुजबळ यांना सीमावादावर बोलण्याचा अधिकार आहे. कारण ते सीमावादाच्या लढ्यात होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सीमाप्रश्नी चाळीस दिवस कारागृहात होते. त्यांना तर या विषयी बोलण्याचा शंभर टक्के अधिकार आहे. जे कधी रस्त्यावर उतरले नाहीत. कधी ज्यांनी पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाल्ल्या नाहीत, त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भूमिकेवर संशय घेणे, विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करणे योग्य नाही. तुम्ही कधी सीमा भागात गेलात? कधी लाठ्या खाल्ल्यात?, कधी जेलमध्ये गेलो नाहीत, कुठलीही केस अंगावर घेतली नाही, असा टोला प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मारला. तसेच मी लाठ्या काठ्या खाल्ल्या आहेत. मला बघायला बाळासाहेब रुग्णालयात आले होते याची आठवणही दरेकर यांनी यावेळी करुन दिली.

पुढे बोलताना दरेकर म्हणाले की, यापूर्वी कधीही केंद्राच्या गृहमंत्र्यांनी सीमावादात हस्तक्षेप केला नव्हता. तो अमित शहा यांनी केला. त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलावले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही त्यावेळी तिथे होते. त्यावेळी जैसे थे परिस्थिती ठेवावी. कुणीही एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले करू नये, अशा प्रकारची भूमिका गृहमंत्र्यांनी दोन्ही राज्यांच्या शांततेतसाठी घेतली. मात्र बोम्मईनी ते ऐकले नाही. जरी ते आमच्या पक्षाचे असले तरी त्यांना पाठीशी घालणार नाही. सीमा भागातील मराठी शाळांना १० कोटी देण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जतमधील ४० ते ४८ गावांत पाणी पोचविण्याचे काम केले होते. आता साधारण दोन हजार कोटी आपण जतच्या सीमा भागातील गावांच्या म्हैसाळ योजनेसाठी देतोय. जानेवारीत त्याची निविदाही निघणार आहे, अशी माहितीही दरेकर यांनी सभागृहात दिली.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सीमावादावर आक्रमक भूमिका मांडतात. आपले मुख्यमंत्री याविषयी ब्र पण काढत नाही, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यावर दरेकर म्हणाले की, आमचे मुख्यमंत्री ब्र नाही काढत तर ते डायरेक्ट ऍक्शन घेतात. डायरेक्ट कार्यक्रम करून टाकतात. आमचे मुख्यमंत्री सत्तेपेक्षा टोकाची भूमिका घेणारे आहेत. ठोस भूमिका घेणारे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवा. सीमावादाप्रशनी मुख्यमंत्री संवेदनशील आहेत, असेही दरेकर यांनी सांगितले. तसेच सीमा भागातील लोकांना दिलासा देण्याची गरज आहे. त्यांच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे हे सांगण्याची आवश्यकता आहे. सीमा भागातील जी मराठी माणसे आहेत त्यांना महाराष्ट्रातील जेवढ्या योजना आहेत, महाराष्ट्र म्हणून जेजे आपण करतो ते त्यांना लागू करता येईल का? याचा सरकारने विचार करावा. सुप्रीम कोर्टात जेव्हा निकाल लागायचा आहे तेव्हा लागेल परंतु सरकार म्हणून आपल्या हातात जेवढे आहे तेवढे लवकरात लवकर शिंदे-फडणवीस यांच्या सरकारने करावे, अशी विनंतीही दरेकर यांनी केली.

Leave a Reply