सिंधुदुर्ग विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव

नागपूर : २६ डिसेंबर – विधान परिषदेत नियम 106 अन्वये सिंधुदुर्ग विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्यासंदर्भातील शासकीय ठराव सोमवारी विधान परिषदेत मंजूर करण्यात आला. यावेळी प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात प्रस्ताव मांडला कोकणातील सिंधुदुर्ग विमानतळाला वारिस्टर नाथ पै विमानतळ सिंधुदुर्ग असे नाव देण्यात यावे, अशी शिफारस ही विधानपरिषद भारत सरकारकडे करी आहे. अश्या आशयाचा हा ठराव होता.
सामंत यांनी प्रस्ताव मांडल्यावर पीठासीन सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रस्ताव पुन्हा वाचून दाखवला आणि त्यानंतर आवाजी मतदानाने तो मंजूर करण्यात आला.
यावेळी शेकापचे सदस्य जयंत पाटील यांनी सूचना केली की नव्या पिढीला बॅरिस्टर नाथ पै यांचे कार्य माहित व्हावे यासाठी विमानतळासोबतच त्यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारा शिलालेख उभारला जावा आणि त्यांचे उचित स्मारक उभारले जावे, ही सूचना मान्य करीत सामंत यांनी सभागृहाला माहिती दिली की बॅरिस्टर नाथ पै यांचे सिंधुदुर्ग मध्ये उचित स्मारक व्हावे यासाठी आपण पूर्वीच पालकमंत्री या नात्याने जिल्हा नियोजन निधीतून २ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात नाथ पै यांचे उचित स्मारक उभारले जाईल याबाबत सभागृहाने खात्री बाळगावी असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहाला सांगितले की, विमानतळांना महापुरुषांची नावे देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. परंतु हे केवळ कागदोपत्री राहू नये. सुमारे तीन वर्षांपूर्वी औरंगाबाद येथील विमानतळाला ‘धर्मवीर संभाजीराजे भोसले’ यांचे नाव देण्याचा ठराव पारित करण्यात आला होता. परंतु अद्याप त्यावर अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. याकडे विरोधी पक्ष नेत्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. या प्रकरणाची दखल घेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शासनाला आदेश दिले की, राज्य शासनाने केंद्र सरकारकडून औरंगाबाद विमानतळाच्या प्रलंबित नामांतरणाची सध्या काय स्थिती आहे. याची माहिती पंधरा दिवसात उपलब्ध करून द्यावी.

Leave a Reply