संजय राऊत यांचे थोडे मानसिक संतुलन बिघडलेले – शंभूराज देसाई

नागपूर : २६ डिसेंबर – राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेला प्रत्त्युतर दिले आहे. तीन-साडेतीन महिने आराम केल्यामुळे त्यांचं थोडसं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, त्यांच्यावर उपचाराची गरज आहे. असं ते म्हणाले आहेत.
संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना शंभूराज देसाई म्हणाले, “रोज नवा मुद्दा काढला जातो, सुरुवात एका मुद्य्यावर करतात, भरकटत तिसरीकडे जातात. त्यामुळे मला असं वाटतंय तीन-साडेतीन महिने आराम केल्यामुळे त्यांचं थोडसं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यांच्यावर उपाचाराची गरज आहे, जेणेकडून अशाप्रकारे बेताल बडबड करण्याचं राऊत थांबवतील. प्रसारमाध्यमंच त्यांना महत्त्व देतात, आम्ही त्यांच्या बेताल वक्तव्यांना महत्त्व देत नाहीत.”
याशिवाय, “मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा हा पूर्वनियोजित होता. महत्त्वाच्या शासकीय बैठकीसाठी मुख्यमंत्री दिल्लीला जात आहेत. दुपारपर्यंत ते परत येणार आहेत. परंतु, शुक्रवारी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा ठराव, विधानसभेत आणला जाणार होता. परंतु आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झालं, तो पुढे ढकलावा लागला. कर्नाटकाच्या ठरावापेक्षा १०० पटीने जास्त मजूबत, ज्यामध्ये महाराष्ट्राची भक्कम बाजू असेल, असा प्रस्ताव आज पूर्ण ताकदीनिशी आम्ही दोन्ही सभागृहात आणणार आहोत.” असंही मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितलं.
याचबरोबर तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणावर बोलताना मंत्री शंभूराज देसाईंनी म्हणाले, “कोणत्याही मुलीची किंवा मुलाची जातीय रंग देऊन हत्या होत असेल किंवा कोणाला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं जात असेल, तर महाराष्ट्रात हे ठीक नाही. ज्या तुनिषा शर्मा केसचा आपण उल्लेख करत आहोत, त्याबाबत पोलिसांशी चर्चा झाली नाही. परंतु मी नक्कीच आज या संदर्भात पोलीस आयुक्तांशी चर्चा करेन. सर्व बाजूने याप्रकरणाची चौकशी व्हावी आणि जे कोणी यामध्ये दोषी असतील, त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल.”

Leave a Reply