मल्लखांब खेळाडूंना सरकारी नोकरीत वेगळे आरक्षण शक्य नाही – गिरीश महाजन

नागपूर : २६ डिसेंबर – मल्लखाम्ब या खेळाच्या खेळाडूंना शासकीय नोकऱ्यांमध्ये वेगळे आरक्षण देणे सध्या शक्य होणार नाही मात्र असे असले तरी खेळाडूंना शासकीय नोकऱ्यांमध्ये जे ५ टक्के आरक्षण दिले जाते त्यात मल्लखांब चा समावेश करून या खेळाडूंनाही प्राधान्य दिले जाईल, अशी घोषणा क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात केली.
विजय गिरकर, प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे, नागो गाणार, रमेश पाटील, रमेश कराड प्रभृती विधानपरिषद सदस्यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात महाजन म्हणाले की मल्लखांब हा खेळ प्रकार क गटात समाविष्ट आहे त्यामुळे या खेळाडूंना थेट नियुक्ती देता येत नाही.
स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत पुढील १५ दिवसात निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात केली.
डॉ. मनीषा कायंदे, प्रसाद लाड, प्रवीण दटके प्रभृती सदस्यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सावंत म्हणाले की, महामार्गांवरील होणाऱ्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेता या संदर्भात त्वरित कारवाई करण्यात येत आहे. यावेळी महामार्गावर दर १०० किलोमीटरवर एक ऍम्ब्युलन्स उपलब्ध केली जाईल असे त्यांनी मान्य केले.
दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत ज्या खासगी कंपन्यांनी आर्थिक अपहार केले आहेत, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिली.
जयंत पाटील, प्रवीण दरेकर प्रभृती १४ सदस्यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात महाजन यांनी सांगितले की सूर्य वायर्स , ध्येयपूर्ती, जाईजुई आणि ऍस्टर अप्परल या चारही संस्थांच्या विरोधात लेखी तक्रार करण्यात आली आहे. या पैकी सूर्य वायर्स या संस्थेविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याविरुद्ध सूर्या वायर्सने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून न्यायालयाने लवाद नियुक्त केला आहे. सदर लवादाबाबत राज्य सरकारकडून हरकतही घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या संस्थांना सुमारे ७ कोटी २६ लाख रुपयांची अग्रीम रकम देण्यात आळसी असून ही रकम परत मिळवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार हालचाली सुरु असल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.

Leave a Reply