नितीन गडकरींची मानस अँग्रो कंपनी आता बनवणार मद्य

नागपूर : २६ डिसेंबर – नितीन गडकरींच्या ‘पूर्ती ग्रुप’पासून दूर गेलेली मानस अँग्रो इंडस्ट्रीज आता इथेनॉल बनवण्याबरोबरच मद्य तयार करत आहे. पूर्ती ग्रुपमधून मानस अँग्रो आणि सीआयएएन अँग्रो इंडस्ट्रीज या दोन नवीन संस्था निर्माण करण्यात आल्या. आता या दोन्ही कंपन्या गडकरींचे पुत्र सारंग आणि निखिल चालवतात.
गडकरी इथेनॉल सारख्या पर्यायी इंधनाचे समर्थक आहेत. उमरेड तहसीलमधील बेला येथील मानस साखर कारखान्यातून तयार झालेल्या मोलॅसिसपासून इथेनॉल तयार केलं जातं. त्याच युनिटनं आता कप्तान आणि होल स्टोन नावाचं रम आणि व्हिस्कीचं ब्रँड आणलंय. हे उत्पादन नुकतंच रिटेल आउटलेटमध्ये लाँच करण्यात आलंय.
मानसच्या साखर कारखान्यातील मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या स्पिरिटचा वापर पुढील शुद्धीकरणानंतर अल्कोहोल, तसंच इथेनॉल तयार करण्यासाठी केला जातो. अल्कोहोलचं उत्पादन ही फक्त सुरुवात आहे. यानंतर आता बाजारपेठेत चाचणी घेतली जात आहे, असं कंपनीच्या सूत्रांचं म्हणणं आहे. इथेनॉल हे सध्या कंपनीचं मुख्य उत्पादन आहे.
मानस ग्रुपचे संचालक समय बनसोड यांनी सांगितलं की, आम्ही सुरुवातीच्या टप्प्यात आहोत. मद्य देखील स्पिरीटमधून बनवता येत असल्यामुळं कंपनीनं उत्पादनात वैविध्य आणलंय. स्पिरिट हे साखर कारखान्यातून तयार झालेल्या मोलॅसिसपासून बनवलेलं पहिलं उत्पादन आहे. त्यानंतर पुढील प्रक्रियेमुळं इथेनॉल तयार होतं, जे पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी 99 टक्के पेक्षा जास्त शुद्ध असणं आवश्यक आहे. भारतीय बनावटीची विदेशी मद्य (IMFL) बनवण्यासाठी काही प्रमाणात स्पिरीटचा वापर केला जातो.
सध्या आम्ही फक्त पाण्याची चाचणी घेत आहोत. नंतर जसं उत्पादन स्वीकारलं जाईल, तसं उत्पादन आम्ही वाढवू. महाराष्ट्रातील ब्रँडची विक्री करण्याबरोबरच ते उत्पादन उत्तरेकडील राज्यांमध्येही नेण्याची योजना आहे. रमला विशेषतः हिवाळ्याच्या महिन्यांत तिथं चांगली मागणी आहे. इथेनॉलचं मिश्रण 20 टक्के पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट असल्यामुळं येत्या काही दिवसांत उत्पादनाला मोठी मागणी राहण्याची अपेक्षा आहे. यासाठी 1,500 कोटी लिटर इथेनॉलची गरज भासणार आहे, असंही बनसोड यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply