शिवसेना आता राष्ट्रवादीची – संजय शिरसाट

औरंगाबाद : २४ डिसेंबर – महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच शिवसेना राष्ट्रवादीच्या दबावाखाली काम करते, अशी टीका केली जायची. तत्कालिन विरोधक म्हणजे भाजप असे आरोप करायचे. आता तर एकेकाळी शिवसेनेचा भाग असलेला शिंदेगटही ठाकरेगटावर याच मुद्द्याच्या आधारे टीका करत आहे. आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर निशाणा साधलाय.
शिवसेना ठाकरेंची राहिलेली नाही, तर आताची राष्ट्रवादीची आहे, असं आमदार संजय शिरसाट म्हणालेत.
काल सभागृहात जे झालं ते सर्वांनी पाहिलं त्यामुळे आता आम्ही काही बोलायची गरज नाही. ठाकरेगट राष्ट्रवादीच्या दबावाखालीच काम करतो, निर्णय घेतो हे आता स्पष्ट झालंय, असं शिरसाट म्हणालेत.
राष्ट्रवादीने ठाकरेगटाला दत्तक घेतलं आहे, असं म्हणत शिरसाट यांनी ठाकरेगटाला डिवचलं आहे.
विधिमंडळ अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशन काळात सभागृहात बोलताना जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीची शिवसेना असा उल्लेख केला. त्यानंतर आज आमदार संजय शिरसाट यांनी टीव्ही 9 बोलताना पुन्हा एकदा त्याचा उल्लेख केला. याच मुद्द्याच्या आधारे त्यांनी शिवसेनेच्या ठाकरेगटावर टीका केलीय.
विरोधक वारंवार खोके सरकार म्हणत शिंदे-फडणवीस सरकारला हिणवतं. त्यालाही शिरसाट यांनी उत्तर दिलंय. खोक्यांची खुशाल चौकशी करा. तपास यंत्रणा सगळ्याच प्रकरणांची कसून चौकशी करते. ते कुणालाही सोडत नाही. विरोधकांच्या टीकेप्रमाणे जर खरंच खोक्यांचा व्यवहार झाला असेल. तर त्याची चौकशी करा, सत्या काय ते समोर येईल, असंही शिरसाट म्हणालेत.

Leave a Reply