शौचालयात भांडे धुण्याच्या प्रकारानंतर आता शौचालयाच्या प्रवेशद्वारावर फळे धुण्याचा प्रकार उघड

नागपूर : २३ डिसेंबर – हिवाळी अधिवेशनात आलेल्या आमदारांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची राहण्याची व्यवस्था असलेल्या आमदार निवासात ताटं आणि कपबशा शौचालयात धुण्याचा प्रकार परवा आमदार अमोल मिटकरी यांनी व्हिडीओ उजेडात आला होता, त्यानंतर काल तो मुद्दा सभागृहात उपस्थित करण्यात आला.
काल उघडकीस आलेल्या या प्रकरणावरून तरी खानपानाच्या व्यवस्थेच्या स्वच्छतेच्या बाबतीत काळजी घेतली जाईल, अशी अपेक्षा होती. पण आज सकाळी विधान भवन इमारत परिसरात असलेल्या शीतल ज्यूस सेंटरचे कर्मचारी शौचालयाच्या प्रवेशद्वारासमोरच संत्र्याची साल काढताना, इतर फळे धुताना आणि ज्यूससाठी कापताना आढळले. त्यामुळे अधिवेशनात सहभागी झालेल्या हजारो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
विधान परिषद इमारतीच्या अगदी समोर असलेल्या ज्या शीतल ज्यूस सेंटरमध्ये हा प्रकार उघडकीस आला, त्या ज्यूस सेंटरमधून मंत्री, आमदार, सर्व अधिकारी यांना ज्यूस दिला जातो आणि येथे कामासाठी आलेले हजारो लोक ज्यूस पितात. विदर्भाच्या बाहेरून आलेले लोक तर हमखास संत्र्याच्या ज्यूसचा आस्वाद येथे घेतात. पण आज हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गेले चार दिवस येथे ज्यांनी ज्यूस पिला, त्यांना उलटी होणेच, तेवढे बाकी राहिले होते.
शीतल ज्यूस सेंटरचे कर्मचारी शौचालयाच्या बाहेर संत्र्याची सालं आणि फळे धुताना आणि कापताना आढळल्यानंतर त्यांना विचारणा केली. तेव्हा येथे जागाच नसल्यामुळे शौचालयाच्या बाहेर लागुनच असलेल्या जागेत हे काम करावे लागते, असे उत्तर कर्मचाऱ्यांनी दिले. अर्थातच हे उत्तर पचनी पडण्यासारखे नाही.

Leave a Reply