काही दिवसांनी हे पोट्टे तुमच्यावर वरवंटा फिरवेल – पक्षाची खिल्ली उडवणाऱ्यांना राज ठाकरेंचा इशारा

नागपूर : २३ डिसेंबर – आज आमच्या शाखाध्यक्षांना बघून लोकं म्हणतील ‘हे पोट्टं काय करणार? मात्र, काही दिवसांनी हे पोट्टं तुमच्यावर वरवंटा फिरवेल, असा, इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाची खिल्ली उडवणाऱ्यांना दिला आहे. राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते पक्षातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. यावेळी बोलताना त्यांनी मनसेची खिल्ली उडवणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला.
“गेल्यावेळी मी दौऱ्यावर आलो, तेव्हा मनसेला पदाधिकारी मिळत नाही, अशा बातम्या आल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अंजन घालावं यासाठी पदाधिकाऱ्यांना आज पत्रवाटप करण्यात आले आहे. काही पत्रकार एखाद्या पक्षासाठी वाहलेले असतात. काही जणांनी इतके वर्ष पक्षांची दलाली केली असेल, तर त्यांना दुसरा पक्ष वाढत असताना त्रास होणारच आहे. मात्र, नागपूरमधील काही पत्रकार मनसेला प्रोत्साहन देत आहेत”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली.
एखाद्या पक्षाचा विजय आणि पराभव होत राहतो. आधी विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यानंतर तो भाजपाचा बालेकिल्ला झाला. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष यातून गेला आहे. आज आमच्या शाखाध्यक्षांना बघून लोकं म्हणतील ‘हे पोट्टं काय करणार? मात्र, काही दिवसांनी हे पोट्टं तुमच्यावर वरवंटा फिरवेल”, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.
“जनसंघ १९५२ साली जन्माला आला. पुढे आणीबाणी लागू झाली. त्यानंतर मोरारजी देसाईंचे राज्य आले. त्यांची सत्ता गेली आणि इंदिरा पुन्हा निवडून आल्या. त्यानंतर १९८० ला जनसंघाचा भारतीय जनता पक्ष झाला. १९९६ ला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. मात्र, भाजपाला खऱ्या अर्थाने बहूमत हे २०१४ साली मिळाले. १९५२ ते २०१४ कितीही मतभेद असले तरी काम करण्याच्या सातत्यातून त्यांना हे यश मिळाले आहे. काँग्रेसचा संघर्षही मोठा आहे. १९६६ साली बाळासाहेबांनी सुरू केलेली शिवसेनेच्या हातात १९९५ मध्ये सत्ता आली. १९६६ ते १९९५ हा संघर्षाचा काळ होता. मात्र, आजचं राजकारण बघितलं, तर सर्वांना लगेच यश हवं आहे. पण त्यासाठी जिवाचं रान करावं लागलं, मेहनत करावी लागले”, असेही ते म्हणाले.
“येत्या काही दिवसांत नागपूरममध्ये कार्यकर्त्यांसाठी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबीरात सर्वांना पक्षाच्या कामाबाबत मार्गदर्शन करण्यात येईल”, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच कोणत्याही पदावर पोहोचल्यावर कार्यकर्त्यांना तुच्छ लेखू नका, असेही ते म्हणाले.“

Leave a Reply