दिशा सालियन आणि राहुल शेवाळे प्रकरणात विधानपरिषदेचे कामकाज पाचवेळा तहकूब

नागपूर : २२ डिसेंबर – दिशा सालियन प्रकरणात शिवसेना (शिंदे गट) खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपाप्रकरणी आज सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विधानपरिषदेत जोरदार चकमकी झडल्या. परिणामी सभागृहाचे कामकाज पाचवेळा तहकूब करावे लागले आणि सहाव्यांदा दिवसभरासाठी बैठक स्थगित करण्यात आली. या गोंधळात सदर प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. हे विशेष.
आज प्रश्नोत्तराचा तास संपताच भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी माहितीचा मुद्दा उपस्थित करीत खासदार राहुल शेवाळे यांनी काल लोकसभेत आदित्य ठाकरे यांच्यासंदर्भात केलेल्या आरोपांचा उल्लेख केला. हा करताच विरोधी बाकावरील सदस्य संतप्त झाले आणि त्यांनी गोंधळ सुरु केला. हे बघत सत्ताधारी बाकावरील सदस्यही अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धावले. गोंधळ वाढतो आहे बघून सभापतींनी सभागृहाचे कामकाज ५ मिनिटांसाठी तहकूब केले.
कामकाज पुन्हा सुरु होताच सभापतींनी कागदपत्रे पटलावर ठेवण्याची घोषणा केली, संसदीय कामकाज मंत्र्यांनी त्यानुसार कारवाई सुरु करताच पुन्हा सत्ताधारी सदस्य घोषणा देऊ लागले. विरोधी सदस्यांनीही प्रत्युत्तरात घोषणा सुरु केल्या. परिणामी कामकाज एक तासासाठी तहकूब करण्यात आले.
कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर शिवसेना सदस्य अनिल परब यांनी सभागृहाला माहिती दिली की शिवसेना सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून पत्र दिले आहे, मुंबईच्या एका खासदाराने दुबईत एका महिलेवर बलात्कार केला आहे, ही महिला मुंबईत येऊन पोलीस तक्रार करू बघते आहे मात्र तिला पोलीस येऊ देत नसून तिची तक्रारही नोंदवून घेतली जात नाही. अशी माहिती परब यांनी दिली. ही माहिती देत असतानाच सत्ताधारी आक्रमक होऊन गदारोळ करू लागले होते, तर विरोधकांनीही आक्रमक होत घोषणा देणे सुरु केले होते. एसआयटी चौकशी झालीच पाहिजे अश्या घोषणा सुरु झाल्या होत्या. यावेळी सभापतींनी अर्धा तासासाठी सभागृह तहकूब केले.
पुन्हा कामकाज सुरु झाले, त्यावेळी शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनीच आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असल्याची माहिती दिली आणि या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी केली. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूंना शांत करण्यासाठी सभापती डॉ. गोऱ्हे यांनी दोन्ही प्रकरणांची एसआयटी चौकशी व्हावी असे निर्देश देत असल्याची घोषणा केली. तरीही शांत होत नसल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा एक तासासाठी सभागृह तहकूब केले. या तहकुबीनंतर कामकाज सुरु झाले त्यावेळी सभापतींनी पुरवणी मागण्या चर्चेसाठी पुकारल्या मात्र दोन्ही बाजूंकडून घोषणा सुरु असल्यामुळे पुरवणी मागण्यांवर चर्चा होऊ शकली नाही, शेवटी पुरवणी मागण्या मंजूर झाल्या आहेत, असे सभापतींनी घोषित केले आणि, १५ मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.
यावेळी कामकाज सुरु झाले तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरवणी मागण्यांवरील विनियोजन विधेयक सभागृहात मांडले ते आवाजी मतदानाने पारित करण्यात आले. त्यानांतर पुन्हा विरोधकांनी घोषणा सुरु केल्या यावेळी अनिल परब यांनी एसआयटी चॊकशीची मागणी केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभापतींची निर्देश तपासून या सर्व प्रकरणांची एसआयटी चौकशी करण्यात येईल अशी घोषणा केली यावेळी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

Leave a Reply