आमदार निवासातील भांडे धुण्यासाठी टॉयलेटमधील पाण्याचा वापर ! अमोल मिटकरींनी ट्विट केला व्हिडीओ

नागपूर : २२ डिसेंबर – दोन वर्षानंतर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. हे अधिवेशन पहिल्या दिवसापासून वेगवेगळ्या मुद्द्यांना गाजलं आहे. सीमाप्रश्न, महाराष्ट्रातील प्रकल्प, भूखंड घोटाळ्यावरून विरोधकांनी दोन्ही सभागृहात शिंदे-भाजपा सरकारला धारेवर धरलं आहे. त्यातच आता आमदार निवासातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ही व्हिडीओ ट्वीट करत भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.
‘आझादी का अमृत महोत्सव’ हा हॅशटॅग वापरून अमोल मिटकरींनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यामध्ये आमदार निवासातील कपबशी धुण्यासाठी टॉयलेटमधील पाण्याचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप मिटकरींनी केला आहे. “हे आहे नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृह. हजारो कोटीचे टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था,” असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
यानंतर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, “आमदार निवासाचं कोट्यवधी रुपयांचं कंत्राट भाजपाने दिलं आहे. मोजके आमदार त्याठिकाणी राहतात. टॉयलेटमध्ये कपबश्या आणि जेवणाची ताटे धुतले जातात. अजून एक व्हिडीओ आहे, त्यात तिरंगी ध्वजाने इमारती पुसल्या गेल्या आहेत. याबाबत विधानपरिषदेत आवाज उठवणार आहे. १०० कोटी रुपयांचं कंत्राट दिलं असून, ते गेले कुठं,” असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.
अधिकाऱ्यांना निलंबित करा, कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका. कुठले पाणी वापरतात, चहा देतात, कसले हात वापरतात, लक्ष कुठे आहे सरकारचे, अशा प्रश्नांची सरबत्ती आमदार मिटकरींनी केली. परवा पोलिसांना जेवण नव्हते. आता कुणावर कारवाई करणार आणि कुणाला ब्लॅकलिस्ट करणार, हे सरकारने सांगावे, असे मिटकरींनी विचारले. हा व्हिडिओ त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला. त्यावर जो मुद्दा मांडला, मी पण तो व्हिडिओ बघितला. यासाठी जे जबाबदार असतील चौकशी करून कारवाई करू. असे गलिच्छ प्रकार होत असतील आणि आरोग्याच्या काळजी घेतली जात नसेल, तर त्याच्यावर आजच, नक्कीच कारवाई करण्यात येईल, असे फडणवीसांनी सांगितले.

Leave a Reply