सुषमा अंधारेंवर गुन्हा दाखल करा – वारकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

नागपूर : २१ डिसेंबर – सुषमा अंधारे यांनी हिंदू देवी, देवता आणि संतांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओंमुळे सुषमा अंधारे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सुषमा अंधारे यांच्याविरोधात वारकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. ज्या पक्षात अंधारे असतील त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ वारकऱ्यांनी घेतली होती. तसेच वारकरी संघटनेच्या वतीने बुलडाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. आता वारकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. रामगिरी या निवासस्थानी जाऊन वारकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. सुषमा अंधारे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी यावेळी वारकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली आहे.
वारकऱ्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन, त्यांना निवेदन सादर केलं. सुषमा अंधारे यांनी संतांचा अपमान केला आहे. त्यांनी भगवान श्रीराम, शंकर, हनुमानाचा अवमान केला. हिंदू देवदेवतांवर टीका केली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून, कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वारकऱ्यांनी आपल्या निवेदनात केली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांना भेटण्यापूर्वी या वारकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना देखील भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारल्यानं वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मागण्या सादर केल्या.
सुषमा अंधारे यांच्याविरोधात वारकरी आक्रमक झाले असून, ज्या पक्षात अंधारे आहेत त्या पक्षाला मतदान करणार नसल्याची शपथ वारकऱ्यांनी घेतली आहे. सोबतच काही दिवसांपूर्वी वारकरी संघटनेच्या वतीनं बुलडाण्यात अंधारे यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती.

Leave a Reply