मुख्यमंत्र्यांच्या कथित घोटाळा प्रकरणी आज विधानपरिषदेत पुन्हा एकदा गोंधळ

नागपूर : २१ डिसेंबर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कथित जमीन घोटाळ्याचा मुद्दा आज विरोधी पक्षांनी पुन्हा विधानपरिषदेत उपस्थित केला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात झालेल्या चकमकींमुळे सभागृहाचे कामकाज तीनदा १५ मिनिटांसाठी तर एकदा पाऊण तासासाठी स्थगित करावे लागले.
आज दुपारी प्रश्नोत्तरांचा तास संपताच विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला नियम २८९ अन्वये कामकाज थांबवू चर्चा घ्यायची आहे, अशी मागणी ते करू लागले. दानवे बोलायला सुरुवात करताच सत्ताधारी बाकावरील सर्वच सदस्य आक्रमक झाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनाच विधानपरिषद नियमांचे दाखले देत हे बेकायदेशीर वर्तन कसे मान्य केले जाते? असा सवाल केला. सत्ताधाऱ्यांचा हा पवित्रा बघून विरोधकही आक्रमक झाले. गदारोळ वाढतो आहे असे बघून सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केले.
पुन्हा कामकाज सुरु झाले तेव्हा परत एकदा दानवेंनी आपला मुद्दा रेटण्यास सुरुवात केली. परिणामी पुन्हा एकदा गोंधळ झाला आणि कामकाज पुन्हा भोजनासाठी पाऊण तास तहकूब केले गेले. नंतर कामकाज सुरु झाले त्यावेळी परत तोच प्रकार घडला. यावेळी सत्ताधारी पक्षाचे सदस्य अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धावून घोषणा देऊ लागले. त्यामुळे पुन्हा कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
यावेळी पुन्हा एकदा शिवसेना सदस्य अनिल परब यांनी तोच मुद्दा उपस्थित केला, पुन्हा सत्ताधारी सदस्य अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धावले आणि घोषणा देऊ लागले, दरम्यान परब यांची २८९ ची सूचना फेटाळल्याचे सभापतींनी कामकाज सुरळीत सुरु झाले. या गोंधळात आज सभागृह चारदा तहकूब करावे लागले हे विशेष.

Leave a Reply