पक्षात राहून असे प्रकार केलेत, तर हकालपट्टी अटळ – मनसैनिकांना राज ठाकरेंचा दम

मुंबई : २१ डिसेंबर – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल तर आधी राजीनामा द्या आणि नंतर काय घाण करायची ती करा अशा शब्दांत मनसैनिकांना सुनावलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी पक्षातून हकालपट्टी केली जाईल अशा इशाराही दिला आहे. राज ठाकरेंनी मनसैनिकांना पत्र लिहिलं असून सोशल मीडियावर शेअर केलं आहे. ही अंतिम ताकीद आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
“सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाटेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स यामुळे हे सगळे शेफारले आहेत. इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे मी खपवून घेणार नाही,” असं राज ठाकरेंनी ठणकावलं आहे.
पुढे ते म्हणालेत की “माझ्या पक्षातल्या कोणालाही पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्याशी बोला, माझ्याशी बोला. पण हे सोडून जर थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल तर आधी राजीनामा द्या. मग त्यानंतर काय घाण करायची असेल ती करा”.
पक्षात राहून असे प्रकार केलेत, तर हकालपट्टी अटळ आहे हे लक्षात ठेवा,” असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. ही समज नाही, तर अंतिम ताकीद आहे याची नोंद घ्या असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply