तिसऱ्या दिवशीही ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी…

नागपूर : २१ डिसेंबर – घेतले खोके भूखंड ओके… भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो… खोके सरकार हाय हाय… खोके घेऊन भूखंडाचा श्रीखंड खाणार्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो … भूखंड गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा… ‘मित्रा’ चे लाड करणार्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा…मुख्यमंत्र्यांचा कारनामा द्यावाच लागेल राजीनामा…या सरकारचं करायच काय, खाली डोकं वर पाय… मुख्यमंत्र्यांची खोलली पोल हल्लाबोल हल्लाबोल…छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणार्या राज्यपालाला हटवा.. ईडी सरकार हाय हाय…स्थगिती सरकार हाय हाय… अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी सलग तिसऱ्या दिवशी विधानभवन परिसर दणाणून सोडला.
आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्याचे पहायला मिळाले.
विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह नाना पटोले, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, रवींद्र वायकर, रोहित पवार, अशोक चव्हाण, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील शशिकांत शिंदे, सुनील राऊत, सुनील प्रभू, प्रणिती शिंदे यांच्यासह विरोधी पक्षाचे सर्वच आमदार सहभागी झाले होते. एनआयटीचा ८३ कोटींचा भूखंड २ कोटीत देऊन घोटाळा केल्याचा ठपका मुख्यमंत्री व सरकारवर ठेवण्यात आला असून या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे, असे आमदारांनी सांगितले.

Leave a Reply