तर भारत जोडो यात्रा थांबवावी – केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांचे राहुल गांधींना पत्र

नवी दिल्ली : २१ डिसेंबर – भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचं पालन करावं लागेल. नियमांचं पालन करता येत नसेल तर भारत जोडो यात्रा थांबवावी, अशा आशयाचं पत्र आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलंय. राजस्थानात सध्या भारत जोडो यात्रा सुरु आहे. पण तिथे भारत जोडो यात्रेमुळे फैलावत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. ही संख्या लक्षात घेता आपण नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. जर नियमांचं पालन करणं होत नसेल तर आपण आपली भारत जोडो यात्रा थांबवावी, असं आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी पत्रात म्हटलंय. दुसरीकडे भारत जोडो यात्रेला मिळत असलेल्या तुफान प्रतिसादामुळे ही यात्रा थांबविण्याच्या केंद्राच्या हालचाली असल्याचा सूर काँग्रेसच्या गोटातून उमटतो आहे.
राजस्थानचे खासदार पीपी चौधरी, निहाल चंद, देवजी पटेल यांनी आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहून भारत जोडो यात्रेतून पसरणाऱ्या कोरोना महामारीबाबत चिंता व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांत देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यासोबतच राजस्थानमध्ये भारत जोडो यात्रा सुरू आहे. यामध्ये देशातील विविध राज्यातील लोक सहभागी होत आहेत. इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांमुळे राजस्थानमध्ये कोरोना पसरण्याचा धोका आहे. प्रवासात सहभागी झालेल्या प्रवाशांमध्येही कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू हेही यात्रेतून परतल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अशा परिस्थितीत याबाबत सतर्क राहण्याची गरज असल्याचं मत खासदारांनी आरोग्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून व्यक्त केलं होतं.
त्यामुळे राजस्थानमध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेत कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले जावे. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा. यात्रेत केवळ लसीकरण झालेले लोकच सहभागी होतील याची खात्री करावी, अशा सूचना करतानाच आरोग्यमंत्र्यांनी मार्गदर्शक सूत्रांचं पालनाचं आग्रह धरत जर पालन होणार नसेल तर यात्रा रद्द होईल, असा इशाराच काँग्रेसला दिला आहे.

Leave a Reply