कोविडचा धोका अद्याप संपलेला नाही – केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय

नवी दिल्ली : २१ डिसेंबर – चीनमध्ये करोनाचा कहर पुन्हा एकदा वाढू लागला आहे. जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिकेत करोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. भारतात दररोज १०० च्या आसपास कोरोना रुग्ण येत आहेत. चीनमध्ये वाढत्या करोनोच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीच्या दृष्टीने काही महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दररोज जीनोम सीक्वेंसिंगसाठी कोविडचा प्रत्येक पॉझिटिव्ह सॅम्पल पाठवण्यास सांगितलं आहे. जेणेकरुन करोनाचा नवा वेरिएंट आला आहे की नाही हे तपासता येईल. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया बुधवारी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना सांगितलं आहे की, कोविडचा धोका अद्याप संपलेला नाही.
चीनमध्ये कोविड निर्बंधांमध्ये काहीशी सूट दिल्यानंतर आता पुन्हा एकदा करोनाचा कहर वाढू लागला आहे. रुग्णालयातील रुग्णांच्या संख्येत ९५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे कोविड रुग्णांसाठी बेड आणि हेल्थ वर्कर कमी पडत आहेत. जमिनीवर झोपून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. औषधांची कमतरता, ऑक्सिजनचं संकटही गडद होत आहे. अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. २४ तास अंत्यसंस्कार सुरू असून परिस्थिती इतकी बिकट आहे, की अंत्य संस्कारासाठी २००० पर्यंत वेटिंग आहे.
गेल्या वर्षी जूनमध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, तीन मोठ्या आरोग्य तज्ज्ञांनी भारताला धोका नसल्याचं म्हटलं आहे. चीनमधील परिस्थितीपासून धडा घेणं आवश्यक आहे, पण घाबरण्याचं कोणतंही कारण नसल्याचं ते म्हणाले. भारतात कोविड जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या भारतात कोविडचा धोका नसल्याचं सांगण्यात आलं आहे. चीन आणि भारताची स्थिती पूर्णपणे वेगळी आहे. भारताची स्थिती चीनपेक्षा अतिशय चांगली असून भारतातील उपाययोजना मेडिकल सायन्सच्या आधारे आहे.
भारतात सध्या जीनोम सिक्वेंसिंग सुरू आहे. जेणेकरुन कोविडचा नवा स्ट्रेन आला की नाही याची माहिती मिळेल. कोविडवर बनलेल्या टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुप NTAGI चे प्रमुख डॉ. एनके अरोडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात हायब्रिड इम्युनिटी आहे. त्याशिवाय शहरी आणि ग्रामीण भागात व्हॅक्सिनेशन बऱ्याच प्रमाणात झालं आहे. दुसरीकडे चीनमध्ये व्हॅक्सिनेशनचं प्रमाण कमी होतं, तसंच तिथे वॅक्सिनच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं.

Leave a Reply