विरोधकांच्या घोषणाबाजीला सत्ताधाऱ्यांचे प्रत्युत्तर

नागपूर : २० डिसेंबर – अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधी पक्षाने ५० खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या. त्याला लगेच सत्ताधारी पक्षानेही ‘५० आमदार एकदम ओके, घरी बसलेले माजले बोके’ म्हणत त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले.
महाविकास आघाडीची बैठक झाल्यावर विरोधी पक्षाने विधान भवन परिसरातील काँग्रेस कार्यालयातून विधान सभेच्या पायरीवर मोर्चा काढला. येथे ५० खोके एकदम ओके, भूंखंडाचा श्रीखंड खाणारे मुख्यमंत्री हाय हाय.., मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या, बिल्डरचे हित जोपासणाऱ्या मुख्यमंत्र्याचा निषेध असो, अशा घोषणा देण्यात आल्या. बेळगाव निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, असा उल्लेखाच्या टोप्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.
दरम्यान सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार आणि भाजप आमदारांनीही त्यांच्या कार्यालयातून विधान सभेच्या पायरीवर कूच करून ५० आमदार एकदम ओके, घरी बसले माजलेले बोके अशा घोषणा देत विरोधकांना प्रत्युत्तर दिले. विरोधी पक्षाच्या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे अंबादास दानवे, आदित्य ठाकरे, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवर, सुनील केदार, अभिजीत वंजारी, विकास ठाकरे, नितीन राऊत, अमोल मिटकरी, जयंत पाटील, राजेश टोपे उपस्थित होते. सत्ताधारी पक्षाच्या आंदोलनात प्रवीण दरेकर यांच्यासह, आशीष शेलार, गोपीचंद पडळकर, किर्तीकुमार (बंटी) भांगडिया, जयकुमार रावल, प्रवीण दटके, समीर कुणावार, अतुल भातखळकर, अतुल सावे, श्वेता महल्ले, सुभाष देशमुख, प्रसाद लाड, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, संजय गायकवाड, संजय बांगर उपस्थित होते. सत्ताधारी पक्षाने यावेळी हिंदू की जो बात करेगा, वही देशमें राज करेगा.. संत महात्मांचा अपमान करणाऱ्या मविआचा धिक्कार असो, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांचा धिक्कार असो, अशा घोषणा दिल्या.

Leave a Reply