विकास कामांना स्थगिती दिल्यावरून अजित पवार विधानसभेत आक्रमक

नागपूर : २० डिसेंबर – हिवाळी अधिवेशनात विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ही कामे कर्नाटक की गुजरातमधील आहेत का? असा संतप्त सवाल अजित पवार यांनी सरकारला विचारला आहे. अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होताच अजित पवार यांनी राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी सरकारला जाब विचारला. राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी अजित पवार यावेळी एकदम आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
“उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळात बजेटमध्ये मंजूर झालेल्या कामांना सभागृहात मान्यता देण्यात आली होती. त्या सर्व कामांना विशेषत: काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सर्व कामांना स्थगिती देण्यात आली आहे. मी स्वत: मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो आहे. सरकार येत असतं, जात असतं. आमच्याही इथे सात टर्म झाल्या आहेत. मनोहर जोशी, राणे यांचं सरकार आम्ही पाहिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सरकारही आम्ही पाहिलं आहे. पण मंजूर झालेली व्हाईट बूकमध्ये आलेली कामं कधी थांबली नव्हती. ही महाराष्ट्रातील कामं आहेत. कर्नाटक, गुजरात किंवा तेलंगणाची कामं नाहीत,” असं अजित पवार यांनी सुनावलं.
यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी वेलमध्ये उतरत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “नही चलेगी नही चलेगी, तानाशाही नही चलेगी… स्थगिती सरकार हाय हाय…५० खोके एकदम ओके” अशा घोषणांनी सभागृह अक्षरशः दणाणून सोडले
विकासकामांना दिलेल्या स्थगितीचा मुद्दा अजित पवारांनी उपस्थित केल्यानंतर खडाजंगी झाली. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी रस्ता सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यावरून वाद झाला. मात्र, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘कोयता गँग’बाबत मुद्दा उपस्थित केल्यानंतर पोलीस प्रशासन आणि नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण वाढलं आहे. महाराष्ट्रात, विशेषत: शहरी भागांमध्ये कोयता गँगची दहशत वाढू लागल्याची चिंता अजित पवारांनी विधानसभेत बोलताना व्यक्त केली आहे.
अजित पवारांनी स्थगन प्रस्ताव मांडत ‘कोयता गँग’चा मुद्दा उपस्थित केला. “राज्याच्या विविध भागांत अशा काही घटना घडल्या आहेत. एक कोयता गँग नावाची गँग निर्माण झाली आहे. ते जातात आणि दहशत निर्माण करतात. काचा फोडतात, महिलांना दमदाटी करतात. हॉटेलमध्ये जाऊन खातात, बिलं देत नाहीत. मध्यमवर्गीयांच्या गाड्यांच्या काचा फोडतात. राज्याच्या शहरी भागात हे मोठ्या प्रमाणावर होतंय”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
“जी मुलं पकडली जातात, ती कॉलेजची मुलं आहेत. कुठेतरी सोशल मीडियावर काहीतरी बघतात, चित्रपट बघतात आणि असा दारू पिऊन गोंधळ घालतात”, असंही अजित पवारांनी यावेळी नमूद केलं.
“माझी सरकारला विनंती आहे, की हे कुठल्याही परिस्थितीत थांबलं पाहिजे. पोलीस दलाच्या आपण मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या आहेत. तो तुमचा अधिकार आहे. पण त्या सगळ्या अधिकाऱ्यांना हे कोयता गँगचे प्रकार होता कामा नयेत, असे आदेश द्यावेत. हवं तर त्यांना मोक्का लावा, तडीपार करा, जी कुठली कठोर कारवाई करायची असेल ती करा”, अशी मागणी अजित पवार यांनी यावेळी केली.

Leave a Reply