मुंबईत ५५०० आशा सेविकांची भरती करणार – एकनाथ शिंदे

नागपूर : २० डिसेंबर – मुंबई महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात यापुर्वीच्या काळात औषध खरेदीत चूकीच्या बाबी घडल्या आहेत. औषध दिरंगाईची चौकशी करण्यात येईल. तसेच, ५५०० आशा सेविकांची भरती करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. मुंबई कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण महापालिका रुग्णालयातील सोई सुविधांचा अभाव असल्याकडे लक्ष वेधीत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी तारांकित प्रश्न उपस्थितीत केला होता.
यावर बोलताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, “या रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरणार का? चुकीची औषध खरेदी व औषध दिरंगाई झाली त्याची चौकशी करणार का?”, असे प्रश्न उपस्थित केलं होतं. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याचे मान्य करुन, रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, अशी ग्वाही दिली. “आशिष शेलार यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे ५००० स्वच्छता दूत जसे नियुक्त करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ५५०० आशा सेविकांचीही भरती करण्यात येईल,” अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली.
या रुग्णालयाबाबतीत सविस्तर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली होती. त्यालाही मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. दरम्यान, पश्चिम उपनगरातील सेव्हन हिल्स रुग्णालय महापालिकेने ताब्यात घ्यावे, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली. ती मान्य करीत याबाबत महापालिकेला सूचना करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या चर्चेत आमदार पराग आळवणी, योगेश सागर सहभागी झाले.

Leave a Reply