नामकरण विधी कार्यक्रमाच्या जेवणातून ७० लोकांना विषबाधा

भंडारा : २० डिसेंबर – मोहाडी तालुक्यातील विहीरगाव येथे आयोजित नामकरण विधी कार्यक्रमाच्या जेवणातून ७० लोकांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना १९ डिसेंबर रोजी समोर आली आहे. अन्नातून विषबाधा झालेल्या रुग्णांना मोहाडी ग्रामीण रुग्णालयासह तुमसर आणि भंडारा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मोहाडी तालुक्यातील विहीरगाव येथील आकाश नारायण ढेंगे यांच्या मुलाचा नामकरण विधी कार्यक्रम १८ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात भोजन करणाऱ्या विहीरगाव येथील नागरीकांना व बाहेरच्या गावातून आलेल्या ७० नागरीकांना अन्नातून विषबाधा झाली. या सर्वांना १९ डिसेंबर रोजी सकाळी अस्वस्थ वाटू लागले. दरम्यान एका पाठोपाठ एक रूणाला अस्वस्थ वाटू लागल्याने गावात एकच खळबळ माजली. येथील विषबाधा झालेल्या नागरिकांना मोहाडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने आरोग्य विभाग, साथरोग निर्मुलन विभाग सुध्दा खडबडून जागे झाले. सध्या आरोग्य विभागाचे एक पथक विहीरगाव येथे तळ ठोकून आहे व नागरीकांची आरोग्य विभागाकडून आरोग्य तपासणी करण्यात येत असल्याची माहिती आहे.
मोहाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या व्यक्ती- लाला नंदलाल साकुरे (४०) रा.कुसारी, अंकुश सुभाष ढबाले, (२५) सकुंतला सुधाकर सिंगनजुडे, (४०), श्रुती चंदन ढेंगे (१५), श्वेता राजेंद्र ढेंगे(९), भावीक अरूण तितिरमारे (१६), गौरव रामप्रसाद ढेंगे(१६), बाबुराव यादोराव माहुले(५०), साक्षी रमेश ढेंगे (१६), सत्यशिला सुकराम पिकंलमुडे (६०), जान्हवी मोरेश्वर ढेंगे (१८), पायल रामप्रसाद ढेंगे(१९), भागरथा आनंदराव ढेंगे(६५), रंजु ज्ञानेश्वर ढेंगे(४०), प्रणय अतुल झंझाड (१७), रा सर्व विहीरगाव. या १५ रुग्णांना मोहाडी, येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अन्य रुग्ण तुमसर आणि भंडारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहीती आहे.
नामकरण कार्यक्रमातील अन्नातून विषबाधा ही भाजीपाला पिंकावर फवारणी करण्यात येत असलेल्या विषारी औषधामुळे विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. उपचार घेत असलेल्या सर्व रूणांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Leave a Reply