भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत फडणवीसांनी केली स्वपक्षीयांची कानउघाडणी

नागपूर : १९ डिसेंबर – भारतीय जनता पक्षाने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे सोशल मीडिया ऑडिट केले असून यापुढेही करणार आहे. ९ जिल्हाध्यक्षांचा अतिशय चांगला रिपोर्ट आहे. ५ जण सरासरी उपयाेग करतात. तर ३१ जण खूपच माघारले आहे. आणि १५ महाभागांचे समाजमाध्यमांवर अस्तित्वच नाही. आपली खरी लढाई विरोधकांशी नसून ते तयार करीत असलेल्या रचलेल्या (नॅरेटीव्ह) कथानकाशी आहे. यापुढे समाजमाध्यमांवर निष्क्रिय राहून चालणार नाही अशी कानउघाडणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. भाजपा प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
विरोधकांमध्ये आपल्याशी लढण्याचा राजकीय दम नाही. त्यामुळे आपली लढाई विरोधकांशी नसून ते रचत असलेल्या कपोलकल्पीत कथानका विरोधात आहे. त्यासाठी समाजमाध्यमांवर कमालीचे सक्रिय राहावे लागेल. या नॅरेटीव्हरला पराभूत करण्यासाठी सामुहिकतेने लढावे लागेल. काही आमदारांच्या फेसबुकवर आठ आठ दिवस पोस्ट येत नाही. तर काहींचे ट्विटर हॅण्डलर सुरूच नाही. मात्र याउलट सामान्य कार्यकर्ते कमालीचे सक्रिय असून ते निकराने ही लढाई लढत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. आपल्याला जिंकायचे असेल तर खोटे कथानक रचण्याचा डाव उलथवून टाकावा लागेल असे ते म्हणाले.
अडीच वर्षांनंतर आपल्याकडे सत्ता आली. आल्या आल्या आपण निर्णय लकवा संपवला आहे. निर्णय न घेणे हा त्यांचा निर्णय होता. निर्णय लकव्याने पीडित सरकार गेल्याने आता कामे पटापट होत आहे. आपल्या कामाच्या वेगाशी त्यांना मॅच करता येत नाही, आपली कामे कॅच करता येत नाही. आणि नाकर्तेपणामुळे त्यांना काही बोलताही येत नाही. म्हणून ते आपल्या विरूद्ध नॅरेटीव्ह तयार करीत आहेत. पण आपण त्यांचा हा डाव हाणून पाडला पाहिजे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आता त्यागाची तयारी ठेवावी. सरकारकडून काही मिळाले पाहिजे अशी अपेक्षा न ठेवता काम करा. कदाचित सरकारकडून काही मिळणारही नाही असे ते म्हणाले.

Leave a Reply