राज ठाकरेंच्या मध्यस्तीने शाईफेक प्रकरणात पोलिसांचे निलंबन व आरोपीवरील कलम ३०७ मागे

पुणे : १३ डिसेंबर – मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीवेळी तिथे उपस्थित ११ पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर राज्य शासनाने कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबनाची कारवाई केली होती. याविरोधात राज्यभरातून संतापाचा सूर होता. पोलिसांना हा प्रकार रोखता आला नाही हे मान्य पण निलंबनाची कारवाई म्हणजे सरकारचं टोकाचं पाऊल आहे, अशा प्रतिक्रिया सामान्यांतून उमटत होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हेच हेरुन थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावून आपलं म्हणणं फडणवीसांच्या कानावर घातलं. गृहमंत्री फडणवीसांनीही राज ठाकरे यांचं म्हणणं विचारात घेऊन निलंबित करण्यात आलेल्या पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांवरची निलंबनाची कारवाई मागे घेत असल्याचा शब्द राज ठाकरे यांना दिला.
पिंपरी चिंचवड येथील शाईफेक प्रकरणी राज ठाकरे स्वतः चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी त्यांचं बोलणं झालं. शाई फेकप्रकरणी दाखल असलेले ३०७ कलम शिथिल करण्याची तयारी चंद्रकांत पाटील यांनी दाखवली. त्याचप्रमाणे पोलिसांचं निलंबन मागे घेऊन त्यांना तात्काळ सेवेत घ्यावे, अशी विनंती राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना केली. ज्याला उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीसांनी तात्काळ होकार दिला आहे.
एका कार्यक्रमात त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकण्यात आली. एक बरं झालं, की चंद्रकांत दादांच्या डोळ्याला कोणतीही इजा झाली नाही. हे झाल्यावर पोलीस आयुक्तांनी तिथे हजर असलेल्या ११ पोलिसांचं निलंबन केलं आणि आरोपींवर भारतीय दंडसंहितेच्या अंतर्गत अनेक कलमांच्या जोडीला, कलम ३०७ देखील लावलं. हे कलम सदोष मनुष्यवधाचं कलम आहे. हे सगळं जेंव्हा मला कळलं तेंव्हा मला सर्वप्रथम हळहळ वाटली ती माझ्या पोलीस बांधवांबद्दल. पोलिसांना हा प्रकार रोखता आला नाही हे मान्य, पण तरीही त्यांच्यावरची कारवाई मला तरी अनाठायी वाटली आणि त्यामुळे मी अस्वस्थ होतो.
याप्रकरणी माझं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्याशी देखील बोलणं झालं. पोलिसांवरचं निलंबन मागे घेऊन, त्यांना पुन्हा सेवेत घ्यावं अशी विनंती मी त्यांना केली, ज्याला त्यांनी तात्काळ होकार दिला. ह्यासाठी त्यांचे मनापासून आभार, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेल्या प्रसिद्धीपत्रात म्हटलं आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर विविध संघटनांचा रोष होता. दोन दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमधील एका कार्यक्रमात समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकली. ज्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या ११ पोलिस कर्मचारी-अधिकाऱ्यांवर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी निलंबनाची कारवाई केली. या कारवाईविरोधात नागरिकांच्या आणि पोलीस बांधवांच्या तीव्र भावना होत्या. याच भावना लक्षात घेऊन राज ठाकरे यांनी गृहमंत्री फडणवीसांशी संवाद साधला.

Leave a Reply