भारतीय व चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीचे संसदेत राजनाथ सिंह यांनी दिले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : १३ डिसेंबर – अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारत आणि चिनी सैन्यात झालेल्या चकमकीच्या मुद्द्यावरून संसदेत विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले आहे. या मुद्द्यावर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत उत्तर दिलं आहे. 9 डिसेंबर रोजी चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न केला, त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे चीनला आपल्या देशात परत जावे लागले. ते म्हणाले की, या चकमकीत आमचा एकही जवान शहीद किंवा गंभीर जखमी झालेला नाही.
तवांग चकमकीबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लोकसभेत बोलत होते. अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारताची चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीच्या मुद्द्यावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दुपारी 12 वाजता संसदेत लेखी निवेदन वाचून दाखवले. ते म्हणाले, “9 डिसेंबर रोजी पीएलएच्या सैनिकांनी तवांग सेक्टरच्या यांगत्से भागात घुसखोरी तसेच अतिक्रमण केले. आमच्या जवानांनी या प्रयत्नाला खंबीरपणे तोंड दिले. आमच्या सैनिकांनी धैर्याने या परिस्थितीचा सामना केला आणि चिनी सैन्याला माघार घेण्यास भाग पाडले.”
संरक्षण मंत्री म्हणाले, “हा मुद्दा चीनकडेही गंभीरतेने उचलला गेला आहे. मी सभागृहाला खात्री देऊ इच्छितो की, भारतीय सैन्य आपच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. तसेच इतर कोणत्याही परिस्थितीला आव्हान देण्याचा प्रयत्न पराभूत करण्यास तयार आहेत. राजनाथ सिंह पुढे म्हणाले, “या लढाईत दोन्ही बाजूचे काही सैनिक जखमी झाले. मात्र मी या सदनाला सांगू इच्छितो की आमचा एकही सैनिक शहीद झाला नाही किंवा त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. भारतीय लष्करी कमांडर्सच्या वेळीच हस्तक्षेपामुळे, चीनच्या सैन्याने माघार घेतली आहे.”

Leave a Reply