प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मीच तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची व्यक्ती – नितीन गडकरी

नवी दिल्ली : १३ डिसेंबर – केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी नवी दिल्लीमधील एका कार्यक्रमामध्ये सोमवारी वाहन उद्योग क्षेत्रातील कार्यक्रमामध्ये मोठं विधान केलं. “प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मीच तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे,” अशं गडकरी यांनी जाहीर भाषणामध्ये म्हटलं. वाहन उद्योगासंदर्भातील ‘एसआयएएम’ने सोमवारी आय़ोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये गडकरींनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या मंत्रालयाने बनवलेल्या चांगल्या रस्त्यांचा सर्वाधिक फायदा हा वाहन उद्योगाला होणार असल्याचंही म्हटलं.
नितीन गडकरींनी सोमवारी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मेक्रर्सच्या (‘एसआयएएम’) कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी गडकरींनी त्यांच्या मंत्रालयाकडून २७ ग्रीनफिल्ड एक्सप्रेस हायवे बांधले जात असल्याची माहिती दिली. तसेच २६० ठिकाणी रोपवे प्रकल्प उभारण्यासंदर्भातील मागण्या आपल्याकडे आल्याचंही ते म्हणाले.
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मीच तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे कारण मी रस्ते निर्माण क्षेत्राचं काम पाहत आहे. यामुळे ज्या एका क्षेत्रातील लोकांचा फायदा होणार आहे ते क्षेत्र म्हणजे वाहन उद्योगाचं आहे,” असंही गडकरींनी सांगितलं. “चांगल्या रस्त्यांमुळे वाहनांची मागणी वाढेल,” असंही गडकरींनी म्हटलं. मागील आठ वर्षांमध्ये देशातील वेगवेगवळ्या भागांमध्ये मोठे प्रकल्प यशस्वी करण्याचं काम गडकरींच्या नेतृत्वाखाली झालं आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी हसत हसत आपणच वाहन क्षेत्रासाठी सर्वात महत्त्वाची व्यक्ती असल्याचं म्हटलं.
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री असलेल्या गडकरींनी त्यांच्या मंत्रालयाकडून दिल्ली ते मुंबई, दिल्ली ते देहरादून, दिल्ली ते हरिद्वार, दिल्ली ते कटरा, दिल्ली ते चंडीगढ, चेन्नई ते बंगळुरु यासारख्या प्रकल्पांबरोबरच इतरही अनेक रस्ते बांधले जात असल्याचं सांगितलं.

Leave a Reply