चालत्या कारमध्ये महिलेचा विनयभंग करून तिच्या १० महिन्याच्या मुलीला कारमधून फेकून दिले

मुंबई : ११ डिसेंबर – मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरार हद्दीत एका २१ वर्षीय विवाहित महिलेचा चालू कारमध्ये विनयभंग करून, तिच्या १० महिन्यांच्या मुलीला कारमधून बाहेर फेकून दिले असल्याचा आरोप पीडित महिलेने केला असून, या घटनेत १० महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला असल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजणाच्या सुमारास विरार फाटा येथे घडली आहे.
या घटनेत महिला जखमी झाली असून वसई-विरार महापालिकेच्या तुळिंज रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले आहेत. या घटनेत भादंवि कलम ३०२, ३५४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मांडवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी दिली आहे.
या घटनेनंतर पिडीत महिलेने माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे, “पीडित महिला ही आपल्या १० महिन्यांच्या मुलीला घेऊन नालासोपारा पेल्हार फाटा येथून इको कारमध्ये बसून आपल्या गावी जाण्यासाठी निघाली होती. काही अंतरावर पुढे गेल्यानंतर कारमधील लोकांनी तिच्याशी असभ्य वर्तन करीत तिची छेड काढले. तिच्या अंगाशी हात लावत तिच्याशी गैरवर्त करत तिच्या १० महिन्यांच्या बाळाला हिसकावत बाहेर फेकले. त्याला वाचवण्यासाठी महिलेनेही गाडीतून बाहेर उडी मारली. त्यात ती जखमी झाली, तर तिच्या बाळाचा जागीच मृत्यू झाला”
असल्याचा आरोप पीडित महिलेने पत्रकारांशी बोलताना केला आहे. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पोलिसांनी त्याच इको कारमध्ये पीडित महिला आणि मुलीला घेऊन तुळिंज येथील रुग्णालयात दाखल केले, पण मुलीचा मृत्यू झाला होता. इको कारचालक विजय कुशवाह याला कारसह मांडवी पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

Leave a Reply