पंकजा मुंडेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

मुंबई : ९ डिसेंबर – ऐन हिवाळ्यात महाराष्ट्राचं राजकारण तापलं असताना आणखी एक घडामोड समोर आली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात जवळपास 40 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्र सरकारचं हिवाळी अधिवेशन येत्या १९ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यापूर्वी राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यातच पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.
शिंदे-भाजप महायुतीच्या नव्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला, तेव्हा पंकजा मुंडे यांच्या नावाची बरीच चर्चा होती. अनेक वर्षांपासून भाजपमध्ये डावलले गेल्याची खंत पंकजा मुंडे यांच्या मनात आहे.
सरकार स्थापन झाल्यावर भाजपकडून ही नाराजी दूर केली जाईल, अशी शक्यता होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर तेही दिसून आलं नाही. पंकजा मुंडे यांच्या नाराज कार्यकर्त्यांनी अक्षरशः रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला होता.
त्यानंतर पंकजा मुंडे यांनी शांततेचं आवाहन केल्यानंतर ही चर्चा शांत झाली. आता मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा लवकरच पार पडणार आहे. त्यामुळे फडणवीस आणि मुंडे यांच्यात काय चर्चा झाली, याचे आडाखे बांधले जात आहेत.

Leave a Reply