छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखण्यासाठी युवकाने आपल्या रक्ताने लिहिले राष्ट्रपतींना पत्र

कोल्हापूर : ९ डिसेंबर – छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल अशा गोष्टी सध्या वारंवार घडत आहेत. या सर्व अपमानास्पद गोष्टींवर शिवभक्तांकडून वेळोवेळी आक्षेप घेतला जातो. कोणीही कधीही छत्रपती शिवरायांबद्दल काहीही जाहीर वक्तव्य करते, त्यामुळे याबाबत संहिता लागू करण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरातील एका युवकाने चक्क स्वत:च्या रक्ताने थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे.
कोल्हापुरातील साठणारी गल्ली, मंगळवार पेठेत शुभम शिरहट्टी हा तरुण राहतो. शुभम शिरहट्टी हा शाहू सेनेचा जिल्हाध्यक्ष आहे. शाहू सेना ही सामाजिक संघटना गेल्या 6 वर्षांपासून कार्यरत आहे. यापूर्वी देखील अशा अनेक घटनांचा निषेध शुभमने केला होता. पण आता नागरिकांची देखील अशा घटनांनंतर गप्प राहायची मानसिकता बनत चाललीय का? असा मनात प्रश्न निर्माण होत होता. तर छत्रपती महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले रक्त अर्पण केलं आहे. तर आपण देखील महाराजांचा होणारा अपमान रोखण्यासाठी आपल्या रक्ताद्वारे या सगळ्याचा निषेध करण्यात खारीचा वाटा उचलू शकतो, या भावनेने मी माझ्या रक्ताने हे पत्र लिहीले आहे, असे शुभमने सांगितले आहे.
काय लिहिले आहे पत्रात ?
प्रति,

आदरणीय महामहिम राष्ट्रपतीजी,
यांसी विनंतीपुर्वक ….
शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं पहिलं आणि शेवटचं प्रेम ! ३५० वर्षानंतरही शिवाजी महाराजांप्रती एवढी निष्ठा दुर्मिळच.
अंतुलनी भवानी तलवार परत आणण्याचा केलेला स्टंट, कुत्र्याच्या समाधीचा वाद, पुरंदरेनी केलेली विकृत, अनैतिहासिक लेखणी, जेम्स लेनने पसरवलेला खोटा इतिहास, अफवा सर्वदूर पसरवण्याचं काहींचं सुरु असलेलं दुकान यामुळे महाराष्ट्रवासियांची मनं व्यथित होत आली आहेत.
कोश्यारी शिवरायांना ‘पुराने युग की बात’ म्हणतात, सत्तेच्या हव्यासाच्या बंडाची तुलना शिवपराक्रमाशी होते, एकेरी उल्लेख, अवमान, विटंबना हे काय महाराष्ट्राच्या पचनी पडू शकेल ?
‘जाणता राजा’ एकच..छत्रपती शिवाजी महाराज !
शिवरायांबद्दल कोणीही जाहीर वक्तव्य करताना आपणाकडून एकप्रकारची संहिता लागू व्हावी, जेणेकरून त्याचे तंतोतंत पालन होईल, ही विनंती.
स्वाभिमानी करवीरनगरीतील या शिवशाहूभक्ताच्या रक्ताच्या पत्राची दखल आपण घ्यावी, ही विनंती.
कळावे
आपला नम्र,
शुभम शिरहट्टी,
कोल्हापूर (जिल्हाध्यक्ष, शाहू सेना) ८८८८१९२००६
जेव्हा रक्ताने पत्र लिहायचं ठरलं, तेव्हा आम्ही माझं रक्त एका टेस्ट ट्युबमध्ये काढून आणलं. त्याच रक्ताचा वापर करून एका काडीच्या साहाय्याने कागदावर आम्ही पत्र लिहिलं. त्या पत्रात खाली सही ऐवजी रक्तानेच अंगठा दिला. त्यानंतर हे पत्र पोस्टाने महामहीम राष्ट्रपती यांना पाठवल्याचे देखील शुभम याने सांगितले.

Leave a Reply