हिमाचल प्रदेशमध्ये राजकीय परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी विनोद तावडे यांच्यावर

नवी दिल्ली : ८ डिसेंबर – हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतील अटीतटीच्या लढतीमुळे बहुमताचा आकडा पार करता आला नाही तर, भाजपला सत्ता राखण्यासाठी तारेवरील कसरत करावी लागेल. हिमाचल प्रदेशमधील निकालानंतर उद्भवणारी संभाव्य राजकीय परिस्थिती हाताळण्याची महत्त्वाची जबाबदारी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्यावर सोपवली आहे.
दिल्लीमध्ये झालेल्या दोन दिवसांच्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी विनोद तावडे यांना निरीक्षक म्हणून हिमाचल प्रदेशामध्ये जाण्याचा आदेश दिला. त्यानुसार, तावडे मंगळवारी हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे रवाना झाले. तावडे यांनी मुख्यमंत्री जयराम ठाकूर तसेच, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर व अन्य ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. हिमाचल प्रदेशमध्ये गुरुवारी मतमोजणी असून विधानसभेच्या जागांचे चित्र दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल.
हिमाचल प्रदेशमध्ये एकूण ६८ जागा असून यंदा विधानसभेची निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता नसल्याने भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये कमालीची चुरस निर्माण झालेली आहे. बहुमताचा ३५ जागांचा आकडा पार करण्याचा आत्मविश्वास दोन्ही पक्षांना असला तरी, दोघांपैकी एका पक्षाला काठावरील बहुमत मिळण्याची शक्यता आहे वा आम आदमी पक्ष तसेच, अपक्ष यांच्यामुळे दोन्ही पक्ष पूर्ण बहुमतापासून वंचित राहू शकतात. या अनिश्चिततेमुळे हिमाचल प्रदेशमधील राजकीय परिस्थिती अस्थिर बनली असून राज्यातील सत्ता कायम राखण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर उभे राहिले आहे.
चंदिगढ महापालिका निवडणुकीसाठी विनोद तावडे यांनी प्रभारी म्हणून काम पाहिले होते. या निवडणुकीत आम आदमी पक्षाला सर्वाधिक १४ जागा तर, भाजपला १२ जागा मिळाल्या होत्या. तरीही महापौरपद भाजपने खेचून आणले होते. तावडेंचे चंदिगढमधील यशस्वी डावपेच गरज भासल्यास हिमाचल प्रदेशमध्येही उपयुक्त ठरू शकतात, हे लक्षात घेऊन नड्डांनी तावडे यांना निरीक्षक म्हणून पाठवले असल्याचे सांगितले जात आहे. बहुमत न मिळाल्यास सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून आमदारांच्या पुरेशा पाठबळासाठी चाचपणी केली जाऊ शकते.

Leave a Reply