भारतात उष्णतेच्या तीव्र लाटांमुळे माणसाचे जगणे अवघड आणि असह्य होऊ शकते

तिरुअनंतपुरम : ८ डिसेंबर – मानवी जगण्याची मर्यादा ओलांडणाऱ्या उष्णतेच्या लाटा अनुभवणारा भारत हा लवकरच जगातील पहिला देश ठरू शकेल, असे जागतिक बँकेने एका अहवालात म्हटले आहे. गंभीर उष्णतेच्या लाटांमुळे गेल्या काही दशकांत भारतात हजारो मृत्यू झाले. यात चिंताजनक पद्धतीने वारंवार वाढ होत आहे, असेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
एप्रिल २०२२मध्ये देशात अपेक्षेपेक्षा लवकर उन्हाळा सुरू झाला आणि नवी दिल्ली येथे सुमारे ४६ अंश सेल्सियसपर्यंत हा आकडा पोहोचला. मार्च महिना सर्वांत उष्ण ठरला होता, असेही या अहवालात म्हटले आहे. केरळ सरकारच्या भागीदारीत जागतिक बँकेने आयोजित केलेल्या दोन दिवसीय ‘इंडिया क्लायमेट अँड डेव्हलपमेंट पार्टनर्स मीट’दरम्यान हा अहवाल प्रसिद्ध केला जाईल.
देशातील उष्णतेच्या तीव्र लाटांमुळे माणसाचे जगणे अवघड आणि असह्य होऊ शकते, असे भाकीत या अहवालात वर्तवण्यात आले आहे. दक्षिण आशियातील वाढत्या तापमानासंदर्भात बऱ्याच हवामान शास्त्रज्ञांनी दीर्घ काळ सावधगिरी बाळगल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

Leave a Reply