गुजरातमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय तर हिमाचलमध्ये काँग्रेस, पोटनिवडणुकीतही भाजपची पीछेहाट

नवी दिल्ली : ८ डिसेंबर – गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभआ निवडणुकीचे कल समोर आले आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तर हिमाचल प्रदेशातली सत्ता मात्र, भाजपला गमवावी लागली आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या सात विधानसभा पोटनिवडणुकीतही भाजपला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे भाजपची जादू फक्त गुजरातपुरतीच मर्यादीत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
नरेंद्र मोदी यांच्या भाजपने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये घवघवीत यश मिळवले मतमोजणीच्या आकडेवारीनुसार भाजप १८२ पैकी १५४ जागांवर आघाडीवर आहे. हा ट्रेंड शेवटपर्यंत कायम राहिल्यास भाजपला गुजरातमध्ये न भूतो न भविष्यती असा विजय मिळणार आहे. एका बाजूला गुजरातमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले असताना हिमाचल प्रदेश विधानसभा आणि देशभरातील पोटनिवडणुकांमध्ये मात्र भाजपला मोठा फटका बसल्याचे दिसत आहे.
अनेक एक्झिट पोल्सनी हिमाचल प्रदेशमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल, असा अंदाज वर्तविला होता. या परिस्थितीत भाजप आपली केंद्रातील रसद वापरुन सहजपणे सत्तास्थापन करेल, असे म्हटले जात होते. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात हा अंदाज खरा ठरतानाही दिसत होता. परंतु, काही तासानंतर हे चित्र पालटले. मतमोजणीच्या सध्याच्या आकडेवारीनुसार, हिमाचल प्रदेशातील एकूण ६८ जागांपैकी ३9 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर भाजपला फक्त २6 जागांपर्यंत मजल मारता आली आहे. तीन जागांवर अपक्ष उमदेवार जिंकण्याची शक्यता आहे. हिमाचल विधानसभेत बहुमताची मॅजिक फिगर ३५ आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता हिमाचल प्रदेशात काँग्रेस पक्ष सहज सत्तास्थापन करेल, असे दिसत आहे.
तर देशातील सात पोटनिवडणुकांमध्येही भाजपला फटका बसताना दिसत आहे. बहुतांश ठिकाणी भाजपचे उमेदवार पिछाडीवर आहेत.
उत्तर प्रदेशातील मैनपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव होताना दिसत आहे. समाजवादी पार्टीच्या उमेदवार डिंपल यादव यांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी तब्बल 78 हजारांची आघाडी घेतली आहे.
भाजपच्या रघुराज शाक्य यांना 84099 मते मिळाली असून डिंपल यादव यांना 162136 मते मिळाली आहेत. म्हणजे त्या 78037 मतांनी आघाडीवर आहेत. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.
रामपूर सदरमध्येही भाजप पिछाडीवर
उत्तर प्रदेशातील रामपूर सदरमध्येही भाजप पिछाडीवर आहे. समाजवादी पार्टीचे आसिम राजा हे आघाडीवर आहेत. त्यांनी भाजपचे आकाश सक्सेना यांना पिछाडीवर टाकलं आहे. राजा हे 4244 मते घेऊन आघाडीवर आहेत.
खतौलीही हातची जाणार
खतौली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजप पराभवाच्या छायेत आहे. आलएलडीचे उमेदवार मदन भैया 8534 मते घेऊन आघाडीवर आहेत. आरएलडीच्या उमेदवाराला 3295 तर भाजपच्या उमेदवाराला 24381 मिळाली आहेत.
कुढनीतही पिछाडीवर
बिहारच्या कुढनी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप पिछाडीवर आहे. 11 व्या फेरीअखेर जेडीयूचा उमेदवार 1176 मतांनी आघाडीवर आहे. या ठिकाणी भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे.

छत्तीसगडही हाती नाही
छत्तीसगडच्या भानुप्रतापपूर जागेवर काँग्रेस भाजपला मात देताना दिसत आहे. काँग्रेसच्या सावित्री मनोज मांडवी या विजयाच्या दिशेने कूच करताना दिसत आहेत. त्या 12436 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे ब्रह्मानंद नेताम पिछाडीवर आहेत. त्या शिवाय इतर दोन जागांवरही भाजप पिछाडीवर असल्याचं चित्रं आहे.

Leave a Reply