मग, राऊत किती षंढ आहेत? – शंभूराज देसाई यांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर

मुंबई : ७ डिसेंबर – महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्यात काल ( ६ नोव्हेंबर ) महाराष्ट्राच्या नोंदणी असलेल्या ट्रकवर बेळगावात हल्ला करण्यात आला. यावरून आता शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडत मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्राचे तुकडे होत असताना इथलं षंढ आणि नामर्द सरकार गप्प बसलयं? तुमच्यात दम असेल तर आधी दिल्लीला विचारा, हे चालणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
संजय राऊतांच्या टीकेला आता मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “सीमाप्रश्नी केंद्राशी समन्वय साधून महाराष्ट्राची बाजू भक्कम मांडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे करत आहेत. असे असताना षंढ हा शब्द सरकारसाठी वापरला. संजय राऊतांना १५ दिवसांपूर्वी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी समन्स बजावण्यात आलं होतं. त्यासाठी सुद्धा धाडस संजय राऊतांच्या नाही. मग, राऊत किती षंढ आहेत,” असा टोला देसाई यांनी लगावला.
“संजय राऊतांनी आपलं तोंड आवरावं, आताच साडेतीन महिन्यांचा आराम करून बाहेर आला आहेत. बाहेरचं वातावरण तुम्हाला सुट होत नाही, असं तुमच्या बडबडण्यावरून वाटत आहे. त्यामुळे पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये. अशी वक्तव्य संजय राऊतांनी टाळावा,” असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला आहे.
“संजय राऊत सांगतात आम्ही पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकात जाऊ. संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व सोडलं का? उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वापेक्षा त्यांना शरद पवार श्रेष्ठ वाटतात. अडीच वर्षे उद्धव ठाकरेंना सांगत होते, संजय राऊतांपासून सावध राहावा. संजय राऊत राष्ट्रवादीच्या आरी गेले आहेत. शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला नेऊन बांधत आहेत. त्याचा प्रत्यय संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावरून आला आहे,” असे शंभूराज देसाईंनी म्हटलं आहे.
शिंदे साहेबांनी कधी लाठ्या काठ्या खाल्या का? असं संजय राऊतांनी विचारलं. त्यावर शंभूराज देसाई म्हणाले, “महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासाठी एकनाथ शिंदेंना ४० दिवस कर्नाटकच्या जेलमध्ये राहावं लागलं. जेलमध्ये किती छळ झाला, हे माध्यमांना आणि सभागृहात सुद्धा मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं. सीमाप्रश्नासाठी ४ तास सुद्धा जेलमध्ये न राहिलेल्या संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर आपली बडबड थांबवली नाहीतर, जशास तसे उत्तर देण्यात येईल. आमदार आणि मंत्रीपद बाजूला ठेऊन मुख्यमंत्र्यांसाठी दोन हात करण्याची तयारी सुद्धा आमची आहे,” असेही शंभूराज देसाईंनी सांगितलं.

Leave a Reply