भाजप आमदार देवराव होळी यांनी स्वपक्षीयांविरुद्धच केली पोलीस तक्रार

गडचिरोली : ७ डिसेंबर – ‘मेक इन गडचिरोली’ प्रकल्पाच्या माध्यमातून लाखोंचा अपहार केल्याच्या आरोपावरून भाजप आमदार डॉ. देवराव होळी यांनी भाजपच्याच पदाधिकाऱ्यांविरोधात बदनामी करीत असल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे केल्याने भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.आ. होळी यांनी पत्रपरिषदेत आपल्यावरील आरोप निरर्थक असून बदनामी करणाऱ्यांविरोधात एक कोटीचा मानहानीचा दावा दाखल केल्याची माहिती दिली.
२०१७ मध्ये भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी उद्योग निर्मितीला चालना देण्यासाठी ‘मेक इन गडचिरोली’ नावाची संकल्पना मांडली. या माध्यामातून अगरबत्ती प्रकल्प, मत्स्यतलाव निर्मिती, भात – गिरणीसारखे विविध उद्योग निर्मितीला अनुदानाच्या माध्यमातून चालना देण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये अनेकांची कोट्यवधींनी फसवणूक केल्याचा आरोप संबंधित लाभार्थ्यांनी केला होता.
वेळोवेळी पीडित लाभार्थ्यांनी पत्रपरिषदेच्या माध्यमातून आपली व्यथा देखील मांडली. गेल्या आठवडाभरापासून यातील काही लाभार्थी नागपूर येथील संविधान चौकात आ. डॉ. होळींविरोधात कारवाई करण्यात यावी, ही मागणी घेऊन उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे मंगळवारी आ. होळी यांनी पत्रपरिषद घेत हा प्रकार राजकीय हेतूने प्रेरित असून यामुळे माझी बदनामी करण्यात येत आहे, असे स्पष्ट केले. सोबत त्यांनी याप्रकरणी पोलीस व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशीसुद्धा झाली असून यामध्ये आपल्याला निर्दोषत्व मिळाल्याचे सांगितले.
यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे बदनामी करणाऱ्यांची यादी सोपवून कारवाईसाठी तक्रार दाखल केली. परंतु तक्रारीत चामोर्शीचे भाजपचे नगरसेवक आशीष पिपरे, समाजमाध्यम संयोजक रमेश अधिकारी व इतर ३१ जणांचे नाव असल्याने भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे, हे सर्व खासदार अशोक नेते यांच्या जवळचे असल्याचे बोलले जाते. यामुळे येत्या काळात जिल्ह्यात भाजप खासदार विरुद्ध आमदार, असा राजकीय सामना रंगण्याची चिन्हे आहेत. पत्रपरिषदेता भाजप जिल्हाध्यक्ष किसन नागदेव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रकरणी चामोर्शीचे नगरसेवक आशीष पिपरे यांनीदेखील आपली भूमिका मांडली आहे. आम्ही आमदार डॉ. होळींविरोधात आंदोलन केले नाही. तरीही आमच्या नावे तक्रार देण्याचे काय कारण असू शकते हे समजण्यापलीकडे आहे. ‘मेक इन गडचिरोली’ संकल्पना कोणी आणली आणि त्याचा व्यवस्थापक श्रीनिवास दोंतुला याला कोण सोबत घेऊन फिरले हे सर्वांनाच माहिती आहे. श्रीनिवास दोंतुला याने मला भातगिरणीच्या नावाखाली २ लाखांनी फसवले. त्याच्याविरोधात आम्ही तक्रार दिली. पण याचे आ. होळींनी वाईट वाटून घेण्याचे काय कारण असू शकते, हे तेच सांगू शकतात, असे आशीष पिपरे म्हणाले.

Leave a Reply